बोदवड न.पं.च्या खुल्या भूखंडावर शाळेचे पक्के अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:37 AM2018-08-27T00:37:29+5:302018-08-27T00:41:37+5:30
बोदवड शहरातील नाडगाव रस्त्यावर पडलेल्या प्लॉटमधील गट क्र.२२९/१ मध्ये इंग्रजी माध्यमाची सुरू असलेल्या शाळेसमोर असलेल्या खुल्या भूखंडावर वर्गखोल्यांचे पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. या बांधकामाला कोणाचा वरदहस्त लाभला आहे, असा सवाल जाणकारांकडून केला जात आहे.
बोदवड, जि. जळगाव : एकीकडे बोदवड नगरपंचायत झाल्याने घर बांधकामाला ना हरकतीचा दाखला मिळण्यासाठी तसेच आराखड्याकरीता घेतला जाणारा कर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असताना नगर पंचायतीच्या नाकावर टिच्चून शहरातील नाडगाव रस्त्यावर पडलेल्या प्लॉटमधील गट क्र.२२९/१ मध्ये इंग्रजी माध्यमाची सुरू असलेल्या शाळेसमोर असलेल्या खुल्या भूखंडावर वर्गखोल्यांचे पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. या बांधकामाला कोणाचा वरदहस्त लाभला आहे, असा सवाल जाणकारांकडून केला जात आहे.
सूत्रानुसार, नाडगाव रस्त्यावर रेव्ह. सेंट पीटर इंग्लिश स्कुल असून या शाळेने याच गटातील पालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर पक्के अतिक्रमण करून पाचशे ते सातशे स्क्वेअर फूट जागा हडप करण्याचा प्रकार सुरू केला आहे. या प्रकाराकडे नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने न.पं.कडे बांधकाम करण्यासाठी कोणतीच परवानगी न मागता तसेच आराखडा न घेता अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. सुमारे पाच लाख रुपये किंमतीची जागा हडप करण्यात आली आहे. तसेच याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पुढील हजार स्केअर फूट जागेवरही शाळेचे खेळण्याचे साहित्य लावून कंपाउंड करून घेतले आहे.
अतिक्रमणासंबंधी काय म्हणतात... अधिकारी आणि पदाधिकारी ?
याबाबत या शाळेचे व्यवस्थापक सॅम पांडे यांची प्रतिक्रिया घेतली असता, बांधकाम परवानगी काढली नाही. परंतु सदर जागा नगरपंचायतीने वापरण्यास दिली असून माझ्याकडे ठराव असल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या गावासाठीच ही शाळा असून सहकार्य करावे असे ते म्हणाले.
नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाचे गणेश हिवराळे यांची प्रतिक्रीया घेतली असता खुल्या भूखंडावर बांधकामाची परवानगी दिलेली नाही, असे त्यांनी सांगितले. तर बांधकाम अभियंता शिंदे यांच्याशी संपर्क झाला नाही.
याबाबत नगराध्यक्षा मुमताज बी बागवान यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी नगरपंचायतीने कोणतीच परवानगी दिलेली नाही. असे सांगत तसेच शासकीय प्रपत्रानुसार एकूण जागेपैकी फक्त दहा टक्के जागेवरच बांधकाम, तेही परवानगीने करावे लागते पण सदर शाळेने परवानगी घेतली नाही कार्यवाही करू असे सांगितले.
तर पालिकेतील विरोधी गटनेते देवेन्द्र खेवलकर यांची प्रतिक्रिया घेतली असता नगर पंचायतीच्या खुल्या भूखंडांना सांभाळण्याची जबाबदारी सत्ताधारी व प्रशासनाची असून त्यांनी या जागांवर देखरेख करून नियोजन करायला पाहिजे.
दरम्यान, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सांगितले की, सदर प्रकाराची माहिती मिळाली आहे. नगरपंचायतीच्या जागेवर असा प्रकार झाला असेल तर तत्काळ नोटीस देऊन बांधकाम पाडण्यास सांगू. तसे न केल्यास नगरपंचायतमार्फत बांधकाम पाडण्यात येईल व खर्च वसूल केला जाईल.