आजपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:49 AM2020-07-07T11:49:29+5:302020-07-07T11:49:40+5:30

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ ते १३ जुलैदरम्यान जळगाव , भुसावळ, अमळनेर या शहरांमध्ये लॉकडाऊन राहणार असून यामुळे ...

Strict lockdown for a week from today | आजपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन

आजपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन

Next

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ ते १३ जुलैदरम्यान जळगाव, भुसावळ, अमळनेर या शहरांमध्ये लॉकडाऊन राहणार असून यामुळे वाढती रुग्णसंख्या रोखता येण्यास मदत होईल. नागरिकांनी याचे स्वयंशिस्तीने पालन करीत ‘जनता लॉकडाऊन’ म्हणून त्याची अंमलबजावणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
दरम्यान, बाहेर फिरण्यावर निर्बंध आणण्यासाठी नागरिकांवर आता ड्रोनचीही नजर राहणार असून जे नागरिक लॉकडाऊनचे उल्लंघन करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता याला आळा बसण्यासाठी ७ ते १३ जुलै दरम्यान जळगाव, भुसावळ, अमळनेर या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेत तसे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी या पूर्वीच दिले आहे. ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या वेळी त्यांनी या लॉकडाऊनविषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण उपस्थित होते.

लॉकडाऊन वाढणार नाही
कोरोना बाधितापासून होणारा प्रादुर्भाव रोखला जावा हा या लॉकडाऊनचा प्रमुख उद्देश हा आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर नागरिक धास्तावून वेगवेगळ््या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करीत आहे. लॉकडाऊन आणखी वाढू शकते, या भीतीत नागरिक आहे. मात्र नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये, हे लॉकडाऊन केवळ सातच दिवस राहणार आहे, त्यात कोणतीही वाढ होणार नाही, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.

पूर्व नियोजित लग्नसमारंभ होणार
पूर्व नियोजित लग्नसमारंभ ५० व्यक्तींच्या मर्यादेत तर अंत्यविधी २० व्यक्तींच्या मर्यादेत करता येणार आहे. त्याचबरोबर दूध वाटप व औषधी दुकाने दिवसभर सुरू राहणार आहे. यामुळे तेथे गर्दी होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आपल्या प्रभागातच पायी जावून दूध व औषधे खरेदी करता येणार आहे.

वृत्तपत्रांचे घरोघर वितरण होणार
लॉकडाऊन काळात केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, कृषी दुकाने, एमआयडीसीतील उद्योग तसेच वृत्तपत्रांची कार्यालये सुरू राहण्यासह वृत्तपत्रांचे घरोघर वितरणही सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.

इतरांना इंधन दिल्यास कारवाई... अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांनाच पेट्रोलपंपावर इंधन उपलब्ध होणार आहे. पेट्रोल पंपचालकांनी इतरांना इंधनचे वाटप करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Strict lockdown for a week from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.