अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:27 PM2019-12-16T22:27:04+5:302019-12-16T22:27:40+5:30
न्यायालय : चाकूने खून करण्याचीही दिली होती धमकी
जळगाव : अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करुन आरोळ्या मारल्या तर चाकूने खून करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात न्यायालयाने श्रीकृष्ण रवींद्र पाटल (२१, रा.चिंचखेडा, ता.जामनेर) याला दीड वर्ष सक्त मजुरी व आठ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी सोमवारी हा निकाल दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २६ सप्टेबर रोजी सकाळी साडे दहा वाजता पीडीत १५ वर्षीय बालिका घरी होती. शाळेत जाण्याची तयारी करीत असताना श्रीकृष्ण पाटील हा पीडितेच्या घरात आला. तिचे तोंड दाबून अश्लिल वर्तन केले नंतर आरोळ्या मारल्या तर चाकू खुपसून मारुन टाकेल अशी धमकी दिली. यावेळी पीडितेचा भाऊ आला असता तेव्हाही त्याने गैरवर्तन केले. दरम्यान, याप्रकरणी जामनेर पोलिसात विनयभंग व बाललैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
पीडितेची साक्ष ठरली महत्वपूर्ण
पोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात अतिरिक्त सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी सहा साक्षीदार तपासले. घटनेचे महत्व व अशा कृत्यांना आळा बसावा व त्याचा संदेश समाजात गेला पाहिजे म्हणून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तीवाद अॅड.चौधरी यांनी केला. त्यात पीडित बालिकेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी याकामी मदत केली.दरम्यान, यातील दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.