कडक निर्बंधांमुळे व्यापाराला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:13 AM2021-04-03T04:13:03+5:302021-04-03T04:13:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण ...

Strict restrictions hit trade | कडक निर्बंधांमुळे व्यापाराला बसतोय फटका

कडक निर्बंधांमुळे व्यापाराला बसतोय फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरातील व्यापाराचे जवळपास ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जळगाव शहरातून संपूर्ण जिल्ह्यात आणि बाहेरच्या जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये व्यापार होत होता. मात्र, गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंत सर्व दुकाने बंद होती. त्यानंतर दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली. हळूहळू व्यापार सुरू झाला. मात्र, तत्पूर्वीच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. व्यापार सुरू झाला असला, तरी ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमताही कमी झाली होती. त्यामुळे कापड बाजार आणि इतर अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी कमी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. परिस्थिती काहीअंशी सुधारली असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून व्यापारात पुन्हा एकदा अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. सध्या कापड बाजारात सामसूम जाणवायला लागली आहे.

दुपारी ऊन तर सायंकाळी निर्बंध

जळगाव शहरातील मार्केटमध्ये सध्या दुपारच्या कडक उन्हामुळे फारसे ग्राहक येत नाहीत. ऊन कमी झाल्यावर सायंकाळी पाच वाजल्यानंतर ग्राहक दुकानात येतात तर सात वाजता दुकान बंद करण्याची घाई असल्याने त्याचा फटका व्यापाराला बसत आहे. यामुळे कापड बाजार आणि जनरल स्टोअर्सचा व्यवसाय आता केवळ ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे.

कोट -

सध्या शासनाने सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना वस्तू बघायला फार वेळ मिळत नाही. दुकाने किमान ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावीत. आधीच दुपारी ऊन असल्याने नागरिक खरेदीसाठी सायंकाळीच बाहेर पडत आहेत. त्यातच लग्न सोहळ्यांवर मर्यादा असल्याने व्यापाराला फटका बसला आहे. शाळा बंद असल्याने गणवेशही विकले गेलेले नाहीत.

- रमेश मताणी, व्यापारी,

दिवसभर तापमान जास्त असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यातच सायंकाळी सात वाजताचे बंधन असल्याने पुरेसा व्यवसायही होत नाही. सततच्या निर्बंधांमुळे शहराबाहेरील नागरिक आता फारसे शहरात येत नाहीत, त्यामुळे व्यापार हळूहळू तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित व्हायला लागला आहे.

- ललित बरडिया, व्यापारी.

Web Title: Strict restrictions hit trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.