जिल्ह्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:13+5:302021-05-01T04:15:13+5:30
जळगाव : जिल्ह्यात सध्या लागू असलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. ...
जळगाव : जिल्ह्यात सध्या लागू असलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. शासनाने २२ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदीसह सुधारित विशेष निर्बंध लागू केले होते. हे निर्बंध शासनाने १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनीही जिल्ह्यातील संचारबंदीसह विविध निर्बंध १५ मेपर्यंत कायम ठेवले आहेत.
शासनाने २२ एप्रिल रोजी आदेश देऊन सर्व आवश्यक सेवा, खाद्य विक्री दुकाने, भाजी व दूध विक्री केंद्र सकाळी सात ते अकरा या वेळेतच खुली ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी हे निर्बंध फक्त १ मे सकाळी सात वाजेपर्यंतच लागू करण्यात आले होते. मात्र, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शासनाने हे निर्बंध १५ मे रोजी सकाळी सातपर्यंत लागू केले आहेत. या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करण्याची जबाबदारी ही संयुक्तरित्या पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील.
२२ एप्रिल रोजी पारित केलेल्या आदेशात शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थिती, लग्न समारंभ दोन तासातच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इतर सर्व निर्बंध हे १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहेत.