३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:16 AM2021-04-07T04:16:44+5:302021-04-07T04:16:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने आदेश न दिल्याने जिल्ह्यातील व्यापारी द्विधा मनस्थितीत होते. अखेर मंगळवारी आदेश जाहीर केले आहेत.
यानुसार ५ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ३० एप्रिल रोजी रात्री १२ पर्यंत जिल्ह्यात रात्री संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सोमवार ते शुक्रवार जिल्ह्यात नागरिकांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय मुक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशात अत्यावश्क सेवांना सूट देण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधा, इन्शुरन्स कार्यालये, किराणा दुकाने, खाद्य पदार्थ विक्री दुकाने यांना सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यात रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मनोरंजनाचे सर्व उपक्रम बंद करण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सार्वजनिक जागेवर वावरताना नागरिकांसाठी जमावबंदी व कोविड १९च्या निर्देशांचे पालन करावे लागेल.
अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, मार्केट, मॉल्स बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारे दुकानमालक व कर्मचारी ४५ वर्षांवरील असतील तर त्यांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच नियमांचे पालन करावे. बंद असलेल्या दुकान मालकांनी दुकानात पारदर्शक काच किंवा शिल्ड, इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट सिस्टम अद्ययावत करून घ्यावी.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत टॅक्सीत निर्धारित केलेल्या क्षमतेच्या ५० टक्के आणि बसमध्ये पूर्ण प्रवासी मात्र उभे प्रवासी नकोत, चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्याला ५०० रुपये दंड आणि प्रत्येक फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहन चालक व कर्मचारी यांंना कोविड १९ आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे आणि तो बाळगणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण अत्यावश्यक करण्यात आले आहे. उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
लग्न समारंभ हे फक्त २० लोकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यात येणार आहेत. मॅरेज हॉलमधील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी आणि ४५ वर्षांवरील लोकांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच शनिवार आणि रविवार लग्न समारंभ शक्यतो टाळावेत तसेच अटी-शर्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यांची पूर्व परवानगी घ्यावी.
अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.
उघड्यावर खाद्यपदार्थ फक्त पार्सलच द्या
उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीच्या जागेवर कुणालाही खाण्यासाठी खाद्य पदार्थ देता येणार नाहीत. तर विक्रीसाठीचे पदार्थ झाकून ठेवण्यात यावे. तसेच पार्सल किंवा होम डिलिव्हरीची सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत देता येईल.
उत्पादन करणारे कारखाने आणि आस्थापना, कंपन्या यांना सर्व सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपनीत ५००पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश आहेत. तसेच ४५ वर्षांवरील व्यक्तिंना लसीकरण करून घेण्याचे आदेशात म्हटले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला १ हजाराचा दंड
कंपनी, मॅरेज हॉल कर्मचारी, डिलिव्हरी देणारे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक व कर्मचारी यांनी लसीकरण केले नसेल किंवा ४५ वर्षांवरील जी व्यक्ती लसीकरण करून घेणार नाही किंवा कोरोना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणार नाही. अशा व्यक्तिंना एक हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
हे सुरू राहतील
हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा तपासणी केंद्रे, मेडिकल, दवाखाने, मेडिकल इन्शुरन्स कार्यालये, औषध विक्रेते, कंपन्या.
किराणा दुकाने, भाजी दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने
रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा,
स्थानिक स्वराज्य संस्थांची मान्सूनपूर्व कामे
कृषी सेवा, माल वाहतूक
ई कॉमर्स
मान्यताप्राप्त मीडिया
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा
पेट्रोल पंप
सर्व कार्गो सेवा
क्लाऊड सर्विस पुरवठादार, माहिती तंत्रज्ञान सेवा
फळ विक्रेते
गॅरेज
कंपन्या, कारखाने
काय राहील बंद
शॉप, मार्केट व मॉल्स
सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे, सभागृहे, स्पोर्टस कॉम्प्लेक्स
रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स,
प्रार्थना स्थळे, धार्मिक स्थळे
सलून, ब्युटी पार्लर, स्पा
शाळा व महाविद्यालये, सर्व कोचिंग क्लासेस
धार्मिक, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम
दहावी, बारावीच्या परीक्षेला सूट
सर्व प्रकारची शाळा व महाविद्यालये बंद राहतील. मात्र, इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सूट देण्यात आली आहे. परीक्षेचे कामकाज पाहणाऱ्या व्यक्तिंना लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे किंवा आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक आहे.