३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:16 AM2021-04-07T04:16:46+5:302021-04-07T04:16:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने आदेश ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र जिल्हा ...

Strict restrictions will be imposed in the district till April 30 | ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने आदेश ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने आदेश न दिल्याने जिल्ह्यातील व्यापारी द्विधा मन:स्थितीत होते. अखेर मंगळवारी आदेश जाहीर केले आहेत.

यानुसार ५ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिल रोजी रात्री १२ पर्यंत जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सोमवार ते शुक्रवार जिल्ह्यात नागरिकांना सकाळी सात ते रात्री आठपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय मुक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधा, इन्शुरन्स कार्यालये, किराणा दुकाने, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने यांना सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मनोरंजनाचे सर्व उपक्रम बंद करण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सार्वजनिक जागेवर वावरताना नागरिकांना जमावबंदी व कोविड १९ च्या निर्देशांचे पालन करावे लागेल.

सर्व अत्यावश्यक नसलेली दुकाने, मार्केट, मॉल्स बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारे दुकानमालक व कर्मचारी ४५ वर्षांवरील असतील तर त्यांनी लसीकरण करून घ्यावे; तसेच नियमांचे पालन करावे. बंद असलेल्या दुकानमालकांनी दुकानाला पारदर्शक काच किंवा शिल्ड, इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट सिस्टीम अद्ययावत करून घ्यावी.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत टॅक्सीत निर्धारित केलेल्या क्षमतेच्या ५० टक्के आणि बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी; मात्र उभे प्रवासी नकोत. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्याला ५०० रुपये दंड आणि प्रत्येक फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाहनचालक व कर्मचारी यांंना कोविड १९ आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे आणि तो बाळगणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण अत्यावश्यक करण्यात आले आहे. उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

लग्नसमारंभ हे फक्त २० लोकांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यात येणार आहे. मॅरेज हॉलमधील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी आणि ४५ वर्षांवरील लोकांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच शनिवार आणि रविवार लग्नसमारंभ शक्यतो टाळावेत. तसेच अटी-शर्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यांची पूर्वपरवानगी घ्यावी.

अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

उघड्यावर खाद्यपदार्थ फक्त पार्सलच द्या

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीच्या जागेवर कुणालाही खाण्यासाठी खाद्यपदार्थ देता येणार नाही; तर विक्रीसाठीचे पदार्थ झाकून ठेवण्यात यावेत; तसेच पार्स किंवा होम डिलिव्हरीची सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत देता येईल.

उत्पादन करणारे कारखाने आणि अेास्थापना, कंपन्या यांना सर्व सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कंपनीत ५०० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश आहेत. तसेच ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करून घेण्याचे आदेशात म्हटले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला एक हजाराचा दंड

कंपनी, मॅरेज हॉल कर्मचारी, डिलिव्हरी देणारे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील चालक व कर्मचारी यांनी लसीकरण केले नसेल किंवा ४५ वर्षावरील जी व्यक्ती लसीकरण करून घेणार नाही किंवा कोरोना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणार नाही, अशा व्यक्तींना एक हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

हे राहील सुरू

हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा तपासणी केंद्रे, मेडिकल, दवाखाने, मेडिकल इन्शुरन्स कार्यालये, औषध विक्रेते, कंपन्या,

किराणा दुकाने, भाजी दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने, रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा,

स्थानिक स्वराज्य संस्थांची मान्सूनपूर्व कामे

कृषी सेवा, मालवाहतूक

ई कॉमर्स

मान्यताप्राप्त मीडिया

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा

पेट्रोल पंप

सर्व कार्गो सेवा

क्लाऊड सर्व्हिस पुरवठादार, माहिती तंत्रज्ञान सेवा

फळविक्रेते

गॅरेज

कंपन्या, कारखाने

काय राहील बंद

शॉप, मार्केट व मॉल्स

सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे, सभागृहे, स्पोर्टस कॉम्प्लेक्स

रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स,

प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे

सलून, ब्यूटी पार्लर, स्पा

शाळा व महाविद्यालये, सर्व कोचिंग क्लासेस

धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम

दहावी, बारावीच्या परीक्षेला सूट

सर्व प्रकारची शाळा व महाविद्यालये बंद राहतील. मात्र इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सूट देण्यात आली आहे. परीक्षेचे कामकाज पाहणाऱ्या व्यक्तींना लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे किंवा आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

Web Title: Strict restrictions will be imposed in the district till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.