धरणगावात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:10 PM2021-02-25T17:10:06+5:302021-02-25T17:11:35+5:30
धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद होती.
तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यात एकमेव उपाय म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासनाने जनता कर्फ्यू घोषित केला. शहरात गुरुवार म्हणजे बाजाराचा दिवस असतो आणि खूप मोठी गर्दी होत असते. म्हणून गुरुवारीच जनता कर्फ्यू लागू करायचा, असे ठरवण्यात आले. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी शहरवासीयांना कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार गुरुवारी जनता कर्फ्यूला व्यापारी वर्गासह नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत दिवसभर आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवले.
बाजारपेठेतील सर्व लहान-मोठे दुकानदार, व्यापारी, भाजीपाला विक्रेते, हातगाडीवर विक्री करणारे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, गॅरेज, फळ विक्रेते तसेच छोटेमोठे सर्व व्यापारी यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यूला सहकार्य केले. अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल, दूध केंद्रे वगळली तर पूर्ण बाजारात शुकशुकाट होता. या पुकारलेल्या बंदचे अनेकांनी स्वागत केले असून कोरोना टाळण्यासाठी हा एकमेव पर्याय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई यावेळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केली.
दर गुरुवारी अशाच प्रकारचा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी जनार्दन पवार तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बंद पाळण्यासाठी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर, जयेश भावसार, योगेश तळेगाव, समसुद्दिन शेख, आण्णा महाजन, रामकृष्ण महाजन, विशाल पचेरवार, संदीप करोसिया, सिकंदर पवार, अनिल पाटील, सुरेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले
कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वारंवार सांगूनदेखील नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या जनता कर्फ्यू ची अत्यंत आवश्यकता आहे. शहरात सगळ्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शासनास सहकार्य केलेले आहे.
मंगल बाळकृष्ण भाटिया,
अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, धरणगाव.
शहरात कोरोनाची दुसरी लाट येते, अशी भीती निर्माण झाली आहे. बाजारपेठेत गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे सर्व टाळण्यासाठी जनता कर्फ्यू लावणे आवश्यक होते, यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळले पाहिजे.
निंबा जंगलू निकम,
नागरिक, धरणगाव