रावेर तालुक्यात आर्द्रा नक्षत्राची जोरदार एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:56+5:302021-06-24T04:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रावेर : शहरासह तालुक्यातील पूर्व भागात बुधवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास आर्द्रा नक्षत्रातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : शहरासह तालुक्यातील पूर्व भागात बुधवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास आर्द्रा नक्षत्रातील दमदार पावसाने धडाक्यात एन्ट्री केली असून, बळीराजाला पेरणीलायक अपेक्षित असलेल्या पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकरीवर्ग सुखावला आहे.
धूळपेरणी करून हलक्या पावसाच्या सरी कोसळून पेरणी धोक्यात येण्याचे संकट ‘आ’वासून असताना किंबहुना काही बीजांकूर पाखरांनी पोखरून फेकली असताना आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस नसला तरी दि. २२ जून रोजी आर्द्रा पर्जन्य नक्षत्र लागताच पावसाने आज दुसऱ्या दिवशीच दमदार हजेरी लावली. सकाळपासून दाटून आलेले मेघ दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास जोरदार बरसल्याने पेरणीलायक पाऊस झाल्याचा आनंद शेतकऱ्यांमधून ओसंडून वाहत होता. काही शेती शिवारातील नाले वाहून निघाली, तर बऱ्याच उंच सखल शेतात पाण्याचे डबके साचल्याचे चित्र आहे. किंबहुना धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांमधूनही आनंद व्यक्त होत आहे. दुपारी तीनच्या सुमारास सावदा भागातही दमदार हजेरी लावली.
जिरायत कापूस, मका, ज्वारी, उडीद, मूग, तूर, सोयाबीन, भुईमूग आदी खरिपाच्या पिकांना धडाक्यात सुरुवात होणार असून, बुधवार दुपारनंतर कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.