जिल्ह्यात मृगाची जोरदार सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:02 PM2021-06-09T22:02:13+5:302021-06-09T22:03:00+5:30
जिल्ह्याच्या अनेक भागात मृगाने जोरदार सलामी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कासोदा ता. एरंडोल/मुक्ताईनगर : जिल्ह्याच्या अनेक भागात मृगाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे या सलामीसोबत दोन बळीही गेले. झाडाखाली आश्रयासाठी थांबलेल्या लोकांच्या अंगावर वीज पडून त्यातील शेतकरी व तरुण असे दोन जण ठार झाले. ही घटना तळई ता. एरंडोल येथे बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका शेतात घडली.
विक्रम दौलत चौधरी (५२) व भूषण अनिल पाटील (१८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी दुपारी तळई परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. गावाजवळील पांढरीच्या शेतातील काही लोक झाडाखाली थांबले होते. याच झाडावर अचानक वीज कोसळली आणि त्यात शेतकरी जागीच ठार झाला तर भूषण हा जखमी झाला. त्याला जळगावकडे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तळईचे माजी सरपंच अशोक महाजन यांनी दिली. भूषण हा ११ वीत शिक्षण घेत होता. पाऊस सुरु झाल्याने या शेतातील झाडाखाली सात जण थांबून होते. इतर पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
वीज पडून १० जण जखमी
दुसरीकडे जीन्सी ता. रावेर येथे एका शेतात ठिबक नळया पसरवित असताना अचानक वीज पडून दहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक भागाला बुधवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान जोरदार पावसाने झोडपून काढले. कुऱ्हा परिसरात अनेक नदी नाल्याना पूर आला. यात सुळे येथील पार्थ नदीला पूर आल्याने नदी काठावर उभी असलेली चारचाकी वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने काही अंतरावर याच नदीवर असलेल्या लहान पुलात हे वाहन अडकून थांबली. पहाटेच्या पावसाने परिसरात अनेक लहान मोठे नाल्याना पूर आला.