जळगावच्या दोन शिक्षकांची धडपड, १० वर्षांपासून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे मोफत धडे
By अमित महाबळ | Published: September 4, 2022 11:01 PM2022-09-04T23:01:00+5:302022-09-04T23:07:50+5:30
परीक्षेच्या तयारीसाठी ते विद्यार्थ्यांना मोफत धडे देखील देतात.
जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा व व्याकरणाची आवड निर्माण व्हावी, तसेच या भाषेबद्दल त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने गेल्या १० वर्षांपासून जळगाव शहरातील भगीरथ इंग्लिश स्कूलमधील इंग्रजी विषयाचे शिक्षक किशोर पाटील व किरण पाटील हे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. एवढ्यावरच न थांबता परीक्षेच्या तयारीसाठी ते विद्यार्थ्यांना मोफत धडे देखील देतात.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत इंग्रजी भाषेच्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. परंतु, अनेक होतकरू विद्यार्थी गरिबीच्या परिस्थितीमुळे किंवा परीक्षा अर्ज भरल्यानंतर क्लास लावण्यासाठी येणाऱ्या खर्चामुळे या परीक्षा देणे टाळतात. ही समस्या लक्षात घेऊन आणि इंग्रजी भाषेत जळगावचे विद्यार्थी मागे पडू नयेत या उद्देशाने शिक्षक किशोर पाटील व किरण पाटील हे नेहमीच धडपड करत असतात. ते इंग्रजी भाषा व व्याकरणाचे मोफत वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
शाळेव्यतिरिक्त १ तास सोमवार ते शनिवार, सकाळी ११ ते १२ वेळेत इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करतात. या वर्गामध्ये इंग्रजी व्याकरण, पत्र लेखन, निबंध लेखन, संभाषण, लेखन कौशल्य, इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन, हस्तलिखित इत्यादी ते शिकवतात. कोरोनाच्या काळात त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी ते विविध उपक्रम राबवत असतात. यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी भाषेबद्दलचा आत्मविश्वास वाढल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होते.
- किशोर पाटील (शिक्षक)
विद्यार्थ्यांच्या अभ्यासात इंग्रजी भाषेमुळे एकाग्रतेत वाढ होते. अभ्यासाचे कौशल्य वाढीस लागते.
- किरण पाटील (शिक्षक)