एसटीची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्सलाही संमिश्र प्रतिसाद -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:15+5:302021-07-11T04:13:15+5:30
सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दुसऱ्या लाटेनंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर महामंडळाच्या बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही पूर्वीप्रमाणे ...
सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुसऱ्या लाटेनंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर महामंडळाच्या बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही पूर्वीप्रमाणे सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही तिसऱ्या लाटेच्या भीतीने प्रवाशांचा महामंडळाच्या रातराणी बसेसला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे, या बसेस रिकाम्या धावत आहेत. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सलाही कधी प्रवासी पूर्ण क्षमतेने, तर कधी निम्मेच प्रवासी मिळत असल्यामुळे बसप्रमाणे ट्रॅव्हल्स कंपन्यांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मालकांनी सांगितले.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने गेल्या महिन्यात ७ जूनपासून सर्वत्र अनलॉक केला आहे. अनलॉक केल्यामुळे सर्व प्रकारच्या बाजारपेठा व उद्योग-व्यवसाय पूर्ववत झाले आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, उद्योग-व्यवसायानिमित्त पुणे व मुंबई या ठिकाणी जाणारे नागरिक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देत असल्यामुळे याचा महामंडळाच्या सेवेवर व खासगी ट्रॅव्हल्सवर मोठा परिणाम झाला आहे. महामंडळाच्या पुणे व मुंबई मार्गावर रिकाम्या बसेस जात आहेत. दुसरीकडे ट्रॅव्हल्सलाही प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे.
इन्फो :
एसटीच्या सुरू असलेल्या रातराणी
- जळगाव ते पुणे
-जळगाव ते मुंबई
इन्फो :
एसटीकडे मुंबई मार्गावर स्लीपर बस
महामंडळातर्फे सध्या पुणे व मुंबई मार्गावर रातराणी बस सुरू आहे. यात मुंबई मार्गावर स्लीपर बस ठेवण्यात आली आहे. या बसमध्ये १५ आसने झोपण्याची व उर्वरित आसने ही बसण्याची आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेसलाही ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच आहे, तर जळगाव विभागाकडे सध्या एकही शिवनेरी बस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सला तिकीट जास्त
एसटी महामंडळाच्या बसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्सला तिकीट दर जास्त आहे. यामध्ये महामंडळाच्या बसचा जळगाव ते पुणे रातराणीचा तिकीट दर ५९५ रुपये आहे, तर ट्रॅव्हल्सचा तिकीट दर ७०० रुपयांपर्यंत आहे. तर मुंबईचे बसला तिकीट ६८० रुपये आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे ९०० रुपयांपर्यंत आहे. मात्र, असे असतानाही बसपेक्षा ट्रॅव्हल्सला प्रवाशांची संख्या जास्त दिसून येत आहे.
इन्फो :
प्रवासी म्हणतात, स्वच्छ आणि आरामदायी प्रवास म्हणून ट्रॅव्हल्सने प्रवास..
एसटी बसपेक्षा ट्रॅव्हल्सला तिकीट जास्तच असते. कारण, बसमध्ये पुरेशी स्वच्छता नसते आणि वातानुकूलित सुविधाही नसते. त्यामुळे दोन पैसे जास्त गेले तर चालतील, मात्र मी नेहमी पुण्याला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सनेच जात असतो.
सुनील वाणी, प्रवासी
---
महामंडळाच्या पुणे-मुंबई मार्गावर स्लीपर बस असल्या, तरी त्यामध्ये ना इंटरनेटची सुविधा, ना एअर कंडिशन हवा असते. त्यामुळे रात्रीचा या गाड्यांतून प्रवास करणे म्हणजे खूप कंटाळा वाटतो. त्यामुळे आरामदायी प्रवासासाठी बसपेक्षा ट्रॅव्हल्सला जास्त तिकीट असले तरी मी कुठेही ट्रॅव्हल्सनेच प्रवास करत असतो.
योगेश पाटील, प्रवासी