लॉकडाऊन मध्ये एसटीचे १८ कोटींचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:46+5:302021-05-30T04:13:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने, राज्य शासनाने १ मे पासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्याने, राज्य शासनाने १ मे पासून कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. या मध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्व सामान्य नागरिकांसाठी बससेवा बंदच होती. सध्या दिवसभरात बोटावर मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे या महिना भराच्या लॉकडाऊन मध्ये १८ कोटींच्या घरात उत्पन्न बुडाले असल्याची माहिती महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली. तसेच १ जून पासून लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता येणार असल्यामुळे औरंगाबाद, नाशिक,पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावरही बसेस सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे सहा महिने महामंडळाची सेवा पूर्णपणे ठप्प होती. तर यंदाही महिनाभराच्या कडकडीत लॉकडाऊन मध्ये लालपरीची ९० टक्के सेवा बंदच होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के सेवा सुरू आहे. सध्या जळगाव आगारातून धुळे,चाळीसगाव, जामनेर या ठिकाणीच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी बससेचा सुरू आहे. दिवसभरात प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सरासरी ८ ते १० फेऱ्या होत आहेत. फेऱ्या कमी असल्याने आगारात सध्या १५ टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे बस मध्ये महामंडळाने ५० टक्केच प्रवाशांना बस मध्ये बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ४४ आसन क्षमतेपैकी एका आसनावर एक या प्रमाणे फक्त २२ प्रवाशांनाच बस मध्ये बसविण्यात येत आहे. यातील १५ प्रवाशी मिळाले, तरी प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे तात्काळ बसेस सोडण्यात येत आहेत. तर बाहेरगावाहुन बसेस आल्यानंतर तात्काळ त्या बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
इन्फो :१ जून पासून फेऱ्या वाढणार आणि उत्पन्नही वाढणार
सध्या लॉकडाऊनमुळे महामंडळाची अत्यावश्यक सेवेतील नागरीकांसाठीच बससेवा सुरू आहे. दिवसभरात फक्त बोटावर मोजण्या इतक्याच फेऱ्या सुरू आहेत. मात्र, एक जूननंतर लॉकडाऊन मधील काही निर्बंध उठविण्यात येणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे औरंगाबाद, नाशिक, पुणे या लांबच्या मार्गावर बसेस सोडण्याचे नियोजन आहे. तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे एक जून पासून फेऱ्या वाढल्यानंतर उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.