जिद्दीची वाट यशापर्यंत पोहचतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:27 PM2018-08-20T15:27:59+5:302018-08-20T15:28:48+5:30
चाळीसगाव : अधिकाऱ्यांचे भावी अधिकाºयांना मार्गदर्शन
चाळीसगाव, जि.जळगाव : आयुष्यात अनेक वळणवाटा असतात. मात्र यशोशिखर गाठण्यासाठी जिद्दीची वाट आवर्जुन चालावीच लागते. चिकाटी आणि मेहनत कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला सिद्ध करते. यातूनच स्पर्धा परीक्षांचे कठीण वर्तुळही भेदता येते, असे मार्गदर्शन औरंगाबादचे सहायक उपायुक्त विष्णू औटी व मुंबई येथील करीअर मार्गदर्शक संजय मोरे यांनी येथे केले.
डॉ.देवरे फाऊंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या ज्ञानदा अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘भूमीपुत्र अधिकाºयांचे भावी अधिकाºयांना मार्गदर्शन’ ही चळवळ प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला. अभ्यासिकेत तरुणांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
या वेळी स्थानिक भूमीपुत्र आयकर उपायुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, विष्णू औटी, संजय मोरे, डॉ.जयवंत देवरे, उज्ज्वला देवरे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, प्रशांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले.
प्रास्ताविकात डॉ.उज्ज्वला देवरे यांनी ज्ञानदा अभ्यासिकेसह मार्गदर्शन उपक्रमाविषयी सविस्तर सांगितले. अभ्यासिकेत तरुणांना मोफत अभ्यास साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार असून, एमपीएससी व युपीएससी परीक्षेत चाळीसगाव तालुक्याचा टक्का वाढविण्यासाठी उपक्रम सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. उज्वलकुमार चव्हाण, अभिजित पवार, मंगेश ठोके, प्रशांत पाटील, किरण पाटील यांनीही मार्गदर्शन केले. आभार फाऊंडेशनचे सचिव ब्रिजेश पाटील यांनी मानले.