विद्यार्थी खून प्रकरण : ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर संचारले खुनाचे भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:46 PM2019-07-02T12:46:05+5:302019-07-02T12:46:47+5:30

शहरात दहशत निर्माण करण्याचा निर्धार अन् मुकेश सपकाळेची हत्या

Student murder case: After watching Kabir Singh, | विद्यार्थी खून प्रकरण : ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर संचारले खुनाचे भूत

विद्यार्थी खून प्रकरण : ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर संचारले खुनाचे भूत

googlenewsNext

सुनील पाटील
जळगाव : कबीर सिंग हा चित्रपट पाहिल्यानंतर किरण अशोक हटकर याच्या अंगात खूनाचे भूत संचारले. आणि तेव्हाच त्याने शहरात दहशत व सनसनाटी निर्माण करण्याचा निर्धार त्याने केला होता. शनिवार मू.जे.महाविद्यालयात झालेल्या भांडणात कानशिलात लगावल्यामुळे संतापात मुकेशचा गेम झाला अशी स्पष्ट कबुली किरण याने तपासात दिली आहे, त्यामुळे मुकेशच्या हत्येमागे अन्य दुसरे कोणतेच कारण नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा. आसोदा) याचा शनिवारी मू. जे. महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये चॉपरने भोसकून खून झाला होता. किरण हटकर यानेच मुकेशवर चॉपरने सपासप वार केले. त्यानंतर किरण व त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पाचोरा आणि तेथून थेट पुणे येथे रवाना झाले. पोलिसांनी रविवारी दुपारी पुण्यातील सिंहगड येथून कार्तिक चौधरी याच्या फ्लॅटमधून किरण हटकर, अरुण बळीराम सोनवणे, तुषार नारखेडे, मयुर माळी व समीर शरद सोनार यांच्या मुसक्या आवळल्या. घटनेच्याच दिवशी इच्छाराम पुंडलिक वाघोदे (रा.समता नगर) याला ताब्यात घेतले होते.
प्लंबर बनून केली संशयितांना अटक
किरण व त्याचे सहकारी पुणे येथे गेले असावेत अशी शक्यता विजयसिंग पाटील यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत जाणवले. त्यानुसार विजयसिंग पाटील यांनी पुणे येथील कार्तिक याच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला हेरले. त्याला सोबत घेऊन थेट पुणे गाठले.
रात्री प्रवासात कार्तिक याच्याशी त्याचे बोलणे सुरु ठेवले. हे पाचही जण अजून आलेच नाही असे कार्तिककडून सांगितले जात असताना पहाटे पाच वाजता कार्तिकचा या तरणाला मीस्ड कॉल आला. परत फोन केल्यावर तुझ्याशेजारी कोण आहेत? याची विचारणा कार्तिकने केली अन् तेथेच पोलिसांना ठाम अंदाज आला. पुण्यात पोहचल्यावर सिंहगड भागात सुदर्शन प्रेसीडेंट या अपार्टमेंटमध्ये कार्तिक असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी प्लॅट मालकाचा शोध घेतला. मालक शंकर रागी यांना थोड्यावेळापूर्वीच फ्लॅटमध्ये पाणी येत नाही, प्लंबर पाठवा म्हणून कार्तिकचा फोन आला होता. सहायक निरीक्षक सागर शिंपी व विजयसिंग पाटील या दोघांनी रागी याला सोबत घेऊन कार्तिकचा फ्लॅट गाठला. दरवाजा उघडताच प्लंबर आलेले आहेत असे सांगून घरात प्रवेश केला असता पाचही जण एका ठिकाणी बसलेले होते. आतून दरवाजा बंद करताच शिंपी व पाटील यांनी पोलीस असल्याची ओळख दिली. बेडशीट फाडून पाचही जणांचे हात बांधले आणि काही अंतरावर थांबलेले पथक वाहनासह इमारतीजवळ बोलावले. यावेळी स्थानिक एका पोलिसाचीही मदत घेण्यात आली होती.
घटनेच्या दोन दिवस आधी पाहिला कबीर सिंग
किरण हटकर व त्याच्या चार मित्रांनी घटनेच्या दोन दिवस आधी शहरातील चित्रपटगृहात कबीर सिंग हा चित्रपट पाहिला. त्यातील नायक शाहीद कपूर हा एका वैद्यकिय महाविद्यालयाचा टॉपर विद्यार्थी असतानाही तो रॅगिंग करतो. तेथे त्याचे एका मुलीशी प्रेमप्रकरण बहरते, मात्र तिच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध होतो. प्रेमभंग झाल्याने त्याचा प्रचंड संताप होतो. त्यामुळे तो ‘अ‍ॅँग्री यंगमॅन’ बनतो.
याच ‘अ‍ॅँग्री यंगमॅन’ च्या भूमिकेत किरण हटकर यानेही स्वत:त बदल करुन शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लिंबू राक्या हा महाविद्यालयात दहशत निर्माण करीत असल्याने आधी त्याचाच गेम करण्याचे किरणने ठरविले. एका मित्राच्या मैत्रीणीचे लिंबु राक्याच्या मित्राने नाव घेतले होते. तेव्हा लिंबू राक्या याने मोबाईलवर किरण याला शिवीगाळ केली होती. तेव्हापासून तो किरणच्या रडारवर होता. घटनेच्या दिवशी देखील लिंबू राक्या महाविद्यालयात आल्याची माहिती किरणला होती. त्याच काळात इच्छाराम याचा रोहीत सपकाळे याच्याशी वाद झाला. त्याने किरण व सहकाऱ्यांना बोलावून घेतले. तेव्हा भावाला मारहाण होत असल्याने मुकेशने किरणच्या कानशिलात लगावली. त्यामुळे राग अनावर होऊन किरण याने मुकेशवर सपासप वार केले.
पुलीस के हात बहोत लंबे होते है !
मुकेश याचा खून झाल्यानंतर समीर वगळता चारही जण पाचोºयात पोहचले. त्यानंतर एका मित्राला समीर याने पाचोरा सोडायला लावले. घटनेनंतर पाचही जणांनी आपले मोबाईल बंद केले. एका मित्राशी संपर्क करुन बॅँक खात्यात २० हजार रुपये जमा करायला सांगितले. जळगाव सोडताना एकाला मुंबई तर दुसºयाला मनमाड जात असल्याचे या पाचही जणांनी सांगितले. पोलिसांची दिशाभूल करणे हा त्यामागील उद्देश होता. समीर हा पोलीस कर्मचाºयाचा मुलगा असल्याने त्याने चारही जणांना ‘पुलीस के हात बहोत लंबे होते है’ असे सांगितले, मात्र आपण मोबाईल बंद केलेले आहेत, त्याशिवाय कार्तिककडे जात असल्याचे हे स्वत: कार्तिकलाही सांगितले नाहीत, त्यामुळे आपण कोणालाच सापडणार नाही असा ठाम विश्वास किरण याला होता.
एस.पी.नीच निवडले तपास पथक
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनीच स्वत: विजयसिंग पाटील यांना फोनकरुन बोलावून घेतले. सहायक निरीक्षक सागर शिंपी, विजयसिंग पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख व किरण धनगर यांना पुण्यात रवाना केले तर विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात तांत्रिक माहितीसाठी तर सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व भास्कर पाटील यांना स्थानिक ते पुणे संपर्क ठेऊन इतर हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली होती. डॉ.उगले हे दर तासांनी पुणे येथील पथक व विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांच्याकडून माहिती घेत होते. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व बी.जी.रोहम हे देखील सातत्याने पथकाच्या संपर्कात होते.आरोपी हाती लागल्याचा निरोप मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.या गुन्ह्यात काम करणाºया पथकाचे एस.पींनी कौतुक केले आहे.

Web Title: Student murder case: After watching Kabir Singh,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव