जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांने घेतला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:23 PM2018-07-06T12:23:04+5:302018-07-06T12:23:53+5:30
प्रवेशाचा पहिला दिवस
जळगाव : जळगाव येथे सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशास गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी एका विद्यार्थ्याने प्रवेश घेतला.
जळगाव येथे वैद्यकीय संकूल (मेडीकल हब) उभारणीसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली. चिंचोली येथे हे महाविद्यालय उभारले जाणार असले तरी तूर्त ते जिल्हा रुग्णालयापासून सुरू झाले आहे.
बारावी व ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. जळगावच्याही वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश असल्याने जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.
जळगावसाठी ८७ विद्यार्थ्यांची यादी प्राप्त
केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून यामध्ये केंद्र सरकारच्या १५ व राज्य सरकारच्या कोट्यातील ८५ विद्यार्थी राहणार आहेत. त्यापैकी सध्या ८७ विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयास प्राप्त झाली आहे. यातील एका विद्यार्थ्याने गुरुवारी वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी दिली. जुलै महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १ आॅगस्टपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे.
‘पंडित दिनदयाल वैद्यकीय संकूल’ नाव देणार
जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय संकुलास (मेडिकल हब) ‘पंडीत दिनदयाल वैद्यकीय संकूल’ असे नाव देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने विधी व न्याय विभागास सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.