विद्यार्थ्याचा खून करुन पाचही जणांनी घेतला मित्राकडे आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:48 AM2019-07-01T11:48:48+5:302019-07-01T11:51:45+5:30
पुण्यातून केली अटक : एक पोलिसाचा मुलगा, निरीक्षकांची उचलबांगडी
जळगाव : मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा.आसोदा) याच्या खून प्रकरणात फरार झालेल्या पाच संशयितांच्या रविवारी दुपारी पुण्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. २४ तासात हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, मुकेश याच्यावर रविवारी सकाळी साडे अकरा वाजता आसोदा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरुण बळीराम सोनवणे, तुषार नारखेडे, किरण अशोक हटकर (रा. नेहरु नगर, जळगाव), मयुर माळी, समीर शरद सोनार, यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान समीर हा पोलिसाचा मुलगा असून त्याचे वडील मुख्यालयात कार्यरत आहेत. इच्छाराम वाघोदे (२०) याला शनिवारीच अटक झाली आहे. यात कोणाची काय भूमिका याची चौकशी पोलीस करीत आहेत. इच्छाराम याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मू.जे.महाविद्यालयात मुकेश सपकाळे याचा शनिवारी चॉपरने भोसकून खून झाला होता. या घटनेनंतर संशयित लगेच तेथून पुण्याला पसार झाले होते. त्यांच्या शोधार्थ ६ पथके रवाना झाली होती. रात्रभर जागून संशयितांपर्यंत पोहचण्यात यंत्रणेला यश आले. एस.पी.रात्रभर ठाण मांडून या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले रात्रभर कार्यालयात ठाण मांडून होते. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्याकडून ते दर तासाला माहिती घेत होते. हेडकॉन्स्टेबल विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे दर तासाला संशयितांची सद्यस्थिती पुण्यात गेलेल्या पथकाला देत होते.
सिंहगड येथे कार्तिक चौधरीच्या ३०२ क्रमांकाच्या एकाच फ्लॅटमध्ये असल्याचे निष्पन्न होताच सहायक निरीक्षक सागर शिंपी व विजयसिंग पाटील यांच्या पथकाने पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. रात्री उशिरा पोलिसांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी देशमुख यांनी कुटुंबियांची समजूत घातली. सकाळी देशमुख व त्यांचे सहकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. १०.३० वाजता मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्तात आसोदा येथे नेण्यात आला. तेथेही कडेकोट बंदोबस्तात मुकेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक आरसीपी प्लाटून व तालुका पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मध्यरात्री दाखल झाले पथक
संशयित आरोपींना घेऊन सहायक निरीक्षक सागर शिंपी यांचे पथक मध्यरात्री शहरात दाखल होणार होते. किरण हटकर याने चॉपरने हल्ला केल्याचे समोर येत आहे.
पाचोरा येथून रेल्वेने पुण्याला रवाना
हल्ला केल्यानंतर पाचही जण शिरसोलीमार्गे पाचोराकडे रवाना झाले. शिरसोली गावाजवळ सर्वांनी आपआपले मोबाईल बंद केले. रात्री आठ वाजता ते पाचोरा रेल्वेस्थानकावर पोहचले.तेथून ते रेल्वेने पुणे येथे रवाना झाले. सिंहगड भागात राहणाऱ्या कार्तिक चौधरी (रा.प्रताप नगर, जळगाव) याच्या फ्लॅटवर ते पोहचले. घटना घडल्यापासून ते कार्तिकच्या संपर्कात होते. कार्तिक हा शिक्षणानिमित्त पुण्यात वास्तव्याला आहे.
निरीक्षक बुधवंत यांच्यावर ठपका
आपल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याच ठपका ठेवत पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी रामानंद नगरचे निरीक्षक दीपक बुधवंत यांची उचलबांगडी करुन नियंत्रण कक्षात हलविले.त्यांचा पदभार सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला. रात्रीच हे आदेश काढण्यात आले.