विद्यार्थ्यांनी तयार केले स्वयंअध्ययनासाठी गणित साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 05:35 PM2018-08-24T17:35:14+5:302018-08-24T17:35:34+5:30
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम
अमळनेर, जि.जळगाव : शहरातील सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनासाठी गणिताचे साहित्य तयार केले आहे. अभ्यासक्रमात झालेल्या बदलामुळे प्रात्यक्षिक किंवा कृती हा विषय आता कार्यानुुभव किंवा चित्रकला यापुरता मर्यादित न राहता गणित विषयातसुद्धा मुले साहित्य बनवू लागली आहेत. विद्यार्थ्यांना स्वंअध्ययनासाठी त्याचा उपयोग होऊ लागला आहे.
कृतीयुक्त अभ्यासक्रम तयार झाल्याने ज्ञानरचनावादावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मुले स्वत: साहित्य बनवून त्याचा पडताळा घेऊ लागली आहेत. सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित शिक्षक डी.ए.धनगर यांच्या मदतीने कमी खर्चात वर्र्र्कींग मॉडेल तयार केले. या उपकरणांच्या साहाय्याने दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार होणारे कोन, संगत कोन, आंतर कोन, बाह्य व आंतर व्युत्क्रम कोन, रेषीय जोडीतील कोन, विरुद्ध कोन, तसेच रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते हे सहजपणे दाखवता येते. समांतर रेषातील आंतरकोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते. व्युत्क्रम कोन एकरुप असतात. दोन रेषा समांतर असतील तर छेदिकेमुळे तयार झालेले संगत कोन एकरुप असतात. हे आणि इतर संकल्पना प्रात्याक्षिकाद्वारे विद्यार्थी सहज दाखवतात.
या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक संस्था सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख व सर्व शिक्षकांनी केले.