दोन वर्षांपासून स्वाधार योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:14 AM2021-06-02T04:14:52+5:302021-06-02T04:14:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. पण, गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. पण, गेल्या दोन वर्षांपासून या शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी सर्व शक्ती सेनेचे संजय मोरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली.
देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी सर्व शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. नंतर निवेदन दिले. राज्यात गरीब, होतकरू, निराधार, अल्पभूधारक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी विविध शहरांमधील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळत नसल्यामुळे अखेर भाड्याने खोली घेऊन रहावे लागते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वाधार योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती मिळते. मात्र, दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी वापरला जातो. शासनाकडे करोडो रुपये राखीव असताना विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे हा लाभ तत्काळ मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आठ दिवसांत लाभ न मिळाल्यास राज्यभरात आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.