विद्यार्थ्यांनो ! तांत्रिक व्यत्ययाची बाळगू नका भीती, कारण विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 09:56 PM2020-10-06T21:56:34+5:302020-10-06T21:56:54+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना ऐनवेळी ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना ऐनवेळी उदभवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक व्यत्ययाची भीती बाळगू नये. कारण या विद्यार्थ्यांना विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार आहे.
यावर्षी प्रथमच ऑनलाईन परीक्षा होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका आहेत. पदवी परीक्षेसाठी दिड तासाचा तर पद्व्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. परीक्षा देतांना ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तर कसे होईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यादृष्टीकोनातून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी काही तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://nmu.unionline.in या लिंक वर जावे त्याठिकाणी विचारण्यात आलेला यूजर आयडी च्या ठिकाणी पीआरएन क्रमांक टाकावा. पासवर्ड साठी विद्यार्थ्याची जन्मतारीख हाच विद्यार्थ्याचा पासवर्ड पासवर्ड आहेआहे (उदा. 06/10/1999 ही जन्मतारीख असेल तर पासवर्ड हा 061099 असा असेल). त्यानंतर ऍक्टिव्ह टेस्ट वर क्लीक करून आपली विद्याशाखा आणि प्रोग्राम नाव निवडायचा आहे. तो क्लीक केल्यानंतर शेवटी कोर्स कोड /विषय नाव हे आपल्या वेळापत्रक / हॉल तिकिटावर दिल्याप्रमाणे निवडायचे आहे.
= पासवर्ड योग्य आहे की नाही याची विद्यार्थीना करावी लागणार तपासण
दरम्यान, लॉगिन यशस्वी झाल्यानंतर फोटो ओळखपत्राची पडताळणी होईल व या पडताळणी नंतर परीक्षेला प्रारंभ होईल. लॉगिन करतांना अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्याने आपला पासवर्ड हा बिनचूक आहे की नाही याची पडताळणी करावी. त्यानंतरही लॉगिन होत नसल्यास संकेतस्थळाच्या प्रशासकाशी परीक्षार्थी हा चाटबोटद्वारे तात्काळ संपर्क साधू शकतो. त्याच्या शंकेचे लगेच निरसन केले जाईल. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्याने ट्रबल लॉगिनचा पर्याय निवडावा त्यामध्ये विद्यार्थ्याने आपला पी आर एन क्रमांक टाकावा. विद्यार्थ्याने नोंदणी केलेल्या मोबाईलची नोंद करावी व परीक्षा निवडावी. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी टाकल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी लॉगिन होईल. हा पर्याय देखील यशस्वी झाला नाही तर विद्यार्थ्यांनी संबधित महाविद्यालयाच्या असलेल्या आय.टी. समन्वयकाशी तात्काळ संपर्क साधावा त्यांच्याकडून विद्यार्थ्याच्या शंकेचे निरसन केले जाईल, असे विद्यापीठ कडून कळविण्यात आले आहे.
= आयटी समन्वयकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
महाविद्यालयनिहाय आयटी समन्वयकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणताही तांत्रिक व्यत्यय आला नाही तर पदवीसाठी परीक्षेचा कालावधी दीड तासांचा व पद्व्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचाच कालावधी राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला तर विद्यार्थ्यांनी घाबरून जावू नये कारण परीक्षार्थींचा विंडो कालावधी तीन तासांचा असणार आहे. अशी माहिती बी.पी. पाटील यांनी दिली.