टवाळखोराने दगड मारुन फेकल्याने जळगावात विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 05:50 PM2018-03-27T17:50:33+5:302018-03-27T17:50:33+5:30
सेंट लॉरेन्स शाळेतील घटनेत डोळ्याजवळ दगड लागल्याने विद्यार्थी जखमी
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि. २७ : वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना अचानक खिडकीतून दगड आल्याने त्यात श्रीकृष्ण रमेश रोटे (वय ६, रा.योगेश्वर नगर, जळगाव) हा सिनियर के.जी.चा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे बारा वाजता सेंट लॉरेन्स शाळेत घडली.
पंचमुखी हनुमान मंदिरानजीक असलेल्या सेंट लॉरेन्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत श्रीकृष्ण रोटे हा विद्यार्थी सिनियर के.जी. या वर्गात शिक्षण घेत आहे. श्रीकृष्ण याची बसण्याची जागा खिडकीजवळ आहे. या खिडकीची काच फुटलेले आहे. वर्गात शिक्षक शिकवित असताना अचानक खिडकीतून दगड आला व तो थेट श्रीकृष्ण याच्या डोळ्याच्यावर भुईवर बसला. यात तो रक्तबंबाळ झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करीत उपचार केले.
या शाळेत सातत्याने दगड फेकण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप श्रीकृष्णचे वडील रमेश रोटे यांनी केला आहे. या खिडकीला काच राहिली असती तर श्रीकृष्ण याला दुखापत झाली नसती. काच बसविण्याचीही तसदी शाळेकडून घेतली जात नाही. दरम्यान, या घटनेबाबत रोटे यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला असता दगड कोणी मारुन फेकला याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील व संबंधित व्यक्ती निष्पन्न झाल्यास पोलिसांकडे तक्रार करु अशी माहिती त्यांनी दिली.