विद्यार्थ्यांचा जळगाव बस स्थानकातच ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:15 PM2018-08-30T12:15:39+5:302018-08-30T12:16:44+5:30
धरणगाव तालुक्यातील धार येथील विद्यार्थी संतप्त
जळगाव : गेल्या आठवड्यातच आव्हाणे येथील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केल्याची घटना ताजी असतानांच, बुधवारी पुन्हा धार येथील विद्यार्थ्यांनी महामंडळाकडून वेळेवर बस सोडण्यात येत नसल्यामुळे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बस स्थानकातच रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केल्यावरही संतप्त विद्यार्थी कुणाचेही ऐकत नसल्याने बस बसस्थानकात गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांचा ताफा दाखल झाला व त्यांनी विद्यार्थ्यांना शांत केले. काही विद्यार्थ्यांनी वाहतूक निरीक्षकांशी हुज्जत घातल्याने, दहा विद्यार्थ्यांच्या पासेस जप्त करण्यात आल्या.
जळगावहून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणगाव तालुक्यातील धार येथील शंभर ते सव्वाशें विद्यार्थी दररोज शिक्षणसाठी जळगावी बसने येत असतात.
धार गावाला वेळापत्रकानुसार बस सोडण्यात येत असते. रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे, बाहेरगावाहून बस येण्याला अर्धातास विलंब झाला होता. बसच्या विलंबाबत विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रार न करता रास्ता रोको करुन वाहतूकीस व्यत्यय आणला. विद्यार्थ्यांना समजावूनही ते ऐकत नसल्यामुळे, नाईविलाजाने त्यांच्या पासेस जप्त कराव्या लागल्या.
-नीलिमा बागूल, सहायक वाहतूक निरीक्षक, जळगाव आगार.