पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:28 AM2021-02-18T04:28:44+5:302021-02-18T04:28:44+5:30

जळगाव : तालुक्यातील वडली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ...

Students' lives are in danger due to collapsed rooms | पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

Next

जळगाव : तालुक्यातील वडली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. पत्रे सडल्याने पावसाचे पाणी थेट वर्गात येते. खिडक्यांची अवस्थाही वाईट झालेली आहे. शौचालय असूनही तेथे पाण्याची व्यवस्था व स्वच्छता नसल्याने ते वापरण्यास अयोग्य आहे. आता तुटलेली पत्रे काढून तीन खोल्यांना नवीन पत्रे लावण्यात आली, थोडक्यात तात्पुरती मलमपट्टी करण्याच आली असली तरी आजार कायमच आहे.

वडली गाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच येते, त्यामुळे तालुक्याचे आमदार, पालकमंत्री व त्याशिवाय जिल्हा नियोजन मंडळाचेही अध्यक्ष पाटीलच असतानाही नवीन शाळा खोल्या मिळालेल्या नाहीत. नवीन काही खोल्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक नितीन धांडे यांनी दिली, परंतु हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश अजाबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून शुध्द पाण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती, मात्र आता ही यंत्रणाही धूळखात पडली आहे. दोन संगणक असूनही ते बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा उपयोगच होत नाही. शौचालय, मुतारी असून नसल्यासारखी आहे. प्रयोगशाळा किंवा संगणक कक्ष नाही. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा भागण्यासाठी ज्याची गरज आहे, त्याचीच येथे कमी आहे. शिक्षक संख्या आठवरून पाचवर आली. अर्थात शासनानेच ही संख्या घटविली. सात वर्गांना पाच शिक्षक अशी स्थिती या शाळेची झाली आहे.

दुरुस्तीवर पैशांची उधळपट्टी

शाळेची दयनीय अवस्था झालेली असताना नवीन पक्क्या शाळा खोल्या देण्याऐवजी जिल्हा परिषदेकडून केवळ दुरुस्तीवरच पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यातून नेमके काय हित साधायचे आहे, हेच कळत नाही. जिल्ह्याचे उन्हाळ्यातील तापमानाची स्थिती पाहता पत्र्याच्या खोल्यांमध्ये बसल्यावर विद्यार्थ्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार न केलेलाच बरा.

कोट...

ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. गावात कोणत्या गोष्टीची अपूर्णता आहे. याचा आढावा घेतला जात आहे. गावकऱ्यांच्या प्राथमिक गरजा, शाळेत नवीन खोल्या, शुध्द पाणी, शौचालय आदी विषय तातडीने मार्गी लावले जातील. त्यासाठी सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.

-मोनिका वसंत पाटील, उपसरपंच

Web Title: Students' lives are in danger due to collapsed rooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.