मुक्कामी मांडळ बस बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 03:39 PM2018-08-22T15:39:27+5:302018-08-22T15:40:10+5:30
अमळनेर तालुक्यातील बस जळीत प्रकरणानंतर दोन दिवस बस गेलीच नाही
अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील मांडळ येथे बस जाळण्याच्या घटनेमुळे दोन दिवस मांडळ बस गेलीच नाही, तर मुक्कामी बस बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच मंगरूळ मार्गे जवखेडा बसच्या सहा फेऱ्या रद्द केल्यानेही विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
गेल्या आठवड्यात मांडळ येथे अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बस जाळल्याने एस. टी. महामंडळाने दोन दिवस मांडळ बस बंद ठेवली. यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. अमळनेर शहरापासून २२ कि.मी. अंतरावर पश्चिमेला पांझरा नदी काठी मांडळ गाव असून, गावाची लोकसंख्या १३ हजार आहे. हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. धुळे, शिंदखेडा या तालुक्याच्या सीमेलगत हे गाव आहे. गावातील सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षणासाठी अमळनेरला ये-जा करत असतात.
याव्यतिरिक्त नोकरी करणारे आणि बाजारासाठी, तालुक्यातील कृषी, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय आदी ठिकाणी ग्रामस्थांचे येणे-जाणे असल्याने दररोज एस. टी. बसची आवश्यकता आहे. दिवसभरात मांडळ गावाला एसटीच्या १२ फेºया होत होत्या. गेल्या शनिवारी पहाटे दीड वाजता अज्ञात व्यक्तीने एस टी पेटवून नुकसान केले. सुदैवाने आग विझवण्यात गावकºयांना यश आले अन्यथा परिसरात हॉटेल, दुकाने असल्याने त्या ठिकाणी असलेले गॅस सिलिंडर पेटले असते तर अनर्थ घडला असता. मात्र एस. टी.चे नुकसान झाल्याने एस. टी. महामंडळाने दोन दिवस मांडळ गावची बस बंद केली होती.
संतप्त ग्रामस्थांनी याबाबत अमळनेर आगारात जाब विचारला असता वाहक व चालक यांनीही सामूहिक निर्णय घेऊन मांडळ येथे बस न्यायची नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी ग्रामस्थ नि एका माथेफिरूच्या कृत्यामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरू नये अन्यथा गावकरी आक्रमक भूमिका घेतील असे सांगितल्यानंतर विभाग नियंत्रकांनी मांडळ बस फेºया सुरू करण्याचे आदेश दिले तरी चालक व वाहक यांनी एसटीच्या नुकसानीस जबाबदार कोण म्हणत बस जाऊ देण्यास नकार दिला होता, मात्र आगारप्रमुखांनी दुपारी १२ वाजेपासून बस सुरू केली, परंतु रात्री मुक्कामी बस बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवल्याने रात्री उशिरा परतणाºया प्रवाशांचे हाल होणार आहेत तर सकाळी पहिल्या गाडीने शाळा महाविद्यालयात येणाºया विद्यार्थ्यांचेही हाल होणार आहेत.
बस जळीत प्रकरणी सीआयडी चौकशी
दरम्यान, मांडळ बस जळीत प्रकरणाची सीआयडीने दखल घेतली असून, अधिकारी घटनास्थळी येऊन गोपनीय चौकशी करून गेले आहेत व राख आणि एसटीचा पत्रा नमुना फॉरेन्सिक प्रयोग शाळेत तपासण्यासाठी घेऊन गेले आहेत. अज्ञात आरोपीचा अद्याप तपास लागला नसल्याचे मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
विभाग नियंत्रकांच्या आदेशाने मांडळ बस बंद करण्यात आली होती आणि त्यांच्याच आदेशाने सुरू करण्यात आली आहे. मुक्कामी गाडी बंद करून विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही. अशा वेळेला गाडी सोडण्यात येईल.
- संजय बाविस्कर, आगार व्यवस्थापक, अमळनेर