विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात धडक, निकाल अन् उत्तरपत्रिका तपासण्यावर आक्षेप
By अमित महाबळ | Published: March 27, 2023 09:11 PM2023-03-27T21:11:00+5:302023-03-27T21:11:15+5:30
विधी शाखेच्या निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवड्यापासून हा मुद्दा गाजत आहे.
जळगाव : विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा लागलेला निकाल अन् उत्तरपत्रिका तपासण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी, खान्देशातील अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जाऊन ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरुंची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२८) दुपारी २.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला सर्व विधी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रत्येकी तीन प्राध्यापक यांना उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे.
विधी शाखेच्या निकालाबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. गेल्या आठवड्यापासून हा मुद्दा गाजत आहे. सिनेटच्या सभेतही तो उपस्थित झाला होता. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आंदोलन केले. मोर्चा काढला, ठिय्या दिला. तसेच महामहामार्गासमोरील प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची भेट घेतली. उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहूनही तपासणीत गुण मिळालेले नाहीत. निकालात त्रुटी आहेत आदी तक्रारी विद्यार्थ्यांनी मांडल्या. सर्व उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करावी, त्यामध्ये बाहेरील प्राध्यापकांना सहभागी करून घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.