खडकदेवळा येथे विद्यार्थ्यांनी केली रॅलीतून मतदान जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 03:30 PM2019-10-20T15:30:48+5:302019-10-20T15:32:17+5:30
मतदान जनजागृतीसाठी माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली.
खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : मतदान जनजागृतीसाठी माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली.
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.
मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी खडकदेवळा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या जनजागृती रॅलीने दोन्ही गावाच्या ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत दोन्ही गावांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहभागी झाल्या. विविध घोषण वाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी माध्यमिक विद्यालय खडकदेवळा व खडकदेवळा खुर्दे येथील प्राथमिक शाळा व खडकदेवळा बुद्रूक येथील प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.