शालेय पोषण आहाराच्या निधीसाठी विद्यार्थ्यांची बँकांमध्ये भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:34+5:302021-07-05T04:11:34+5:30
शेंदुर्णी, ता. जामनेर : मे महिन्याच्या उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराची रक्कम सरळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ...
शेंदुर्णी, ता. जामनेर : मे महिन्याच्या उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराची रक्कम सरळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचा अध्यादेश शिक्षण विभाग व शालेय पोषण आहारअंतर्गत जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पालकवर्ग लहानग्यांना घेऊन बँका व आधार कार्ड केंद्राच्या खेटा मारताना दिसत आहेत. तसेच कोविडची तिसरी लाट ही लहान बालकांवर येण्याची शक्यता सांगितलेली असतानाही असा अध्यादेश काढून शालेय पोषण आहाराच्या फक्त एका महिन्याच्या पोषण आहराच्या रकमेसाठी बालकांच्या आरोग्याशी खेळ का? असा सवाल पालकांनी केला आहे.
शाळेने पालकांना दिलेल्या सूचनांनुसार, पालक आपल्या पाल्याचे बँक खाते उघडण्यासाठी बँकांच्या चकरा मारत आहेत. तसेच पाल्याचा आधारवरील अंगठा, जन्मतारीख, मोबाईल नंबर अपडेट आणि इतर दुरुस्तीसाठी आधार केंद्रांवर लहान मुलांसोबत गर्दी करताना दिसत आहेत. त्यातही काही बँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे बँक खाते उघडण्यात अडथळे येत आहेत. परंतु कोविड तिसरी लाट आणि बँक खाते उघडण्यासाठी लहानग्यांना घेऊन बँकांमध्ये होणारी गर्दी बघता तिसऱ्या लाटेचे निमंत्रण हे खुद्द शासनाच्या अधिकाऱ्यांनीच दिलेले आहे, असे मत काही जाणकार व्यक्त करीत आहेत.
फक्त एक महिन्याच्या पोषण आहारासाठी बँक खाते उघडण्याचे ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही त्यांना सांगितले आहे. त्यांना शालेय पोषण आहाराच्या धान्यासारखीच थेट रक्कम शाळांमधून वितरित करण्यात यावी, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.