भडगाव महाविद्यालयात विद्यार्थिनींनी गिरवले स्वयंसिद्धतेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 02:22 PM2020-01-31T14:22:05+5:302020-01-31T14:23:01+5:30
रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा अभियान पार पडले.
भडगाव, जि.जळगाव : येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा अभियान पार पडले. बदलत्या काळानुसार मुली व महिलांनी शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या कणखर होणे गरजेचे आहे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येते. या अभियानात विद्यार्थिनींसाठी आठ दिवसीय कराटे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
स्वयंसिद्धा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक बबनराव देशमुख होते.
याप्रसंगी संचालक विजयराव देशपांडे, प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड हे उपस्थित होते. समारोप पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन व जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष संजय वाघ यांच्या हस्ते झाला. यावेळी संचालक देशमुख, सतीश चौधरी, विजय देशपांडे उपस्थित होते. जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव संदीप मनोरे, अश्विनी महाजन, कुसुम पाटील, मेघना महाजन व रामचंद्र पाटील यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या माध्यमातून स्वरक्षणाचे विविध धडे दिले. यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी विक्रम बंगाले याला नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये बॉक्सिंग व तायक्वांडो या दोन क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरविण्यात आले.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी व उपप्राचार्य प्रा. एस.आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अतुल देशमुख यांनी केले तर महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सी.एस.पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगरसेविका योजना पाटील, रेखा पाटील उपस्थित होत्या.