गटारीच्या पाण्यातून मार्ग काढत वराडसीम येथील विद्यार्थ्यांनी गाठली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:30 PM2018-06-15T21:30:33+5:302018-06-15T21:30:33+5:30
शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याचे विविध उपक्रम राबवून सर्वत्र स्वागत होत असतांना भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेत मात्र विपरीत चित्र दिसले. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून कसरत करीत मार्ग काढीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि संबंधीतांच्या अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
आॅनलाईन लोकमत
वराडसीम, ता. भुसावळ : विद्यार्थ्याना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आनंददायक शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळेत पहिल्याच दिवशी येणाºया विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके- वह्या देऊन तसेच मिठाई खाऊ घालून त्यांचे स्वागत केले जाते.
यासाठी शालेय परिसर सजवला जातो. बैलगाडी, घोडागाडीवरून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते. शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र विद्यार्थ्याचे असेच स्वागत झाले. भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जि.प. शाळेतही विद्यार्थ्याच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. परंतु तत्पूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश करतांना प्रवेशद्वारापासूनच कसरत करावी लागली. गावातील गटारींमधून वाहून आलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढून शाळा गाठावी लागल्याच्या प्रकार घडल्यामुळे पालकवर्गात संताप व्यक्त करण्यात आला.
गेल्या चार पाच वर्षांपासून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच गावातील गटारींचे अधूनमधून घाण पाणी वाहून येत असते. मात्र ग्रामपंचायतीचे याकडे सर्रास दूर्लक्ष झाले असून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ही समस्या कायम आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी ही समस्या ठळकपणे निदर्शनास आल्याने संतापात भरच पडली होती.
्नग्रामपंचायत प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही दूर्लक्ष केले जात असल्याचे पालकांसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची पालकांकडून मागणी होत आहे. येथे जि.प.च्या पहिली ते चौथीचे चार वर्ग असून ९५ च्यावर विद्यार्थी आहेत, तर अंगणवाडीचे पाच वर्ग असून दिडशे पर्यंत विद्यार्थी आहेत. यंदा या शाळेवर सर्वच शिक्षक बदलून आले असून ते या समस्येविषयी अनभिज्ञ असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.