पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार!
By अमित महाबळ | Published: May 4, 2023 08:32 PM2023-05-04T20:32:54+5:302023-05-04T20:34:19+5:30
परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षेनंतर ३० दिवसांत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या सध्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. कोविडमुळे गेली दोन वर्षे शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक लांबले होते. आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षा संपताच ३० दिवसांच्या आत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार किमान ३० ते कमाल ४५ दिवसांत परीक्षांचे निकाल लावावे लागतात. ही कालमर्यादा पाळली जावी म्हणून नियोजन करण्यात आले आहे.
बी. कॉम. व डी. पी. ए. अभ्यासक्रमांचे पेपर ऑनलाइन तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त प्राध्यापकांनी सहभाग नोंदवावा व वेळेच्या आत ऑनलाइन तपासणी पूर्ण करावी. ३० दिवसांत निकाल लावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाला प्राध्यापकांचे सहकार्य हवे आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी सांगितले.