व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून करून घेतला जातोय अभ्यास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:42 PM2020-03-28T12:42:51+5:302020-03-28T12:44:14+5:30
आरोग्याची काळजी घ्या, शिक्षक करीत आहेत सूचना
जळगाव : कोरोना व्हायरसने जगासह देशभरात धुमाकूळ घातलाय. या पार्श्वभुमीवर सर्व शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे़ तर शाळांची परीक्षाही रद्द केली़ कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातही शाळांकडून विद्यार्थ्यांचे हित जोपासले जात आहे़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, म्हणून अनेक शाळा व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नियमित संपर्कात राहून त्यांच्याकडून अभ्यास करून घेत आहेत. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांनी आॅनलाइन शाळा भरू लागली आहे़
मार्च महिन्याच्या अखेरीस शाळांच्या परीक्षा प्रारंभ होणार होत्या़ पण, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी तरी जाहीर केली़
प्राथमिक शाळांच्या परीक्षाही रद्द केल्या़ विद्यार्थी अभ्यासात मागे पडू नये, यासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी पालकांचा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला आहे़ त्यात दररोज शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून कुठल्या विषयाचा अभ्यास करून घ्यावयाचा आहे, त्याबाबत सूचना केल्या जात आहेत़ त्यामुळे एकीकडे देश कोरोनावर मात करण्यासाठी लढतोय तर दुसरीकडे याच देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी आपल्या शिक्षणात खंड पडु नये यासाठी तंत्रज्ञानाची जोड घेऊन आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. हीच जिद्द पुढील काळात या मुलांना यशस्वी शिखरावर जाण्यासाठी मदत करणार आहे.
शिक्षक पाठवित आहेत व्हिडीओ, नोटस्, प्रश्नसंच
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घरी बसून मिळावे म्हणून विविध व्हिडीओ, गृहपाठाचे प्रश्न पाठविले जात आहेत़ त्याचबरोबर विषयनिहाय अभ्यास कसा घ्यावा, याबाबत ग्रुपवरून पालकांना सूचना केल्या जात आहे़ सुट्टीच्या काळात पालकांनी पाल्यांची काळजी घेवून अधिकाअधिक वेळ त्यांच्यासोबल घालविण्याचेही आवाहन केले आहे़ विद्यार्थ्यांनीही पालकांसोबत ग्रंथ, पुस्तके तसेच भगवतगीता वाचन करावे,असेळी शाळांनी सूचना दिल्या आहेत़ दुसरीकडे महाविद्यालयांमधील प्राध्यापकांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात आहे़ तर ग्रुपवर नोट्स आणि प्रश्नसंच पाठवून ते घरी सोडून परीक्षा काळासाठी आवश्यक अभ्यास करून घेतले जात आहे़