महाराष्ट्र केसरीवर उपमहाराष्ट्र केसरीची मात; हनुमान जन्मोत्सवानिमित्त रंगला कुस्त्यांचा आखाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 05:41 PM2023-04-06T17:41:55+5:302023-04-06T17:42:41+5:30
पृथ्वीराज पाटील यांना नमवत माउली कोकाटे बनले आमदार केसरी
- निंबा सोनार
पिलखोड, जि. जळगाव : हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुधवारी पिलखोडच्या माली तालीम संघातर्फे आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यावर ‘गुणांनी’ मात करीत माउली कोकाटे हे पहिले आमदार केसरी ठरले आहेत.
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या मानाच्या कुस्तीसाठी अडीच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शेकडो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माउली कोकाटे यांच्यात अंतिम सामना रंगला. जवळपास ३५ मिनिटापेक्षाही अधिक वेळ कुस्ती रंगली. पण कुस्तीत निर्णय होऊ शकला नाही. ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या सूचनेनुसार गुणांवर निकाल जाहीर करण्यात आला.
आमदार मंगेश चव्हाण व विजय चौधरी यांच्या हस्ते माउली कोकाटे यांना २ लाख ५१ हजार रुपये रोख व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत अनेक कुस्त्या लावण्यात आल्या. यशस्वीतेसाठी माउली तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.