जळगाव निरीक्षण गृहातील वैशालीचे थाटात शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 05:31 PM2017-05-04T17:31:34+5:302017-05-04T17:31:34+5:30
संचालकांनी केले कन्यादान : अधीक्षिका बनल्या आई-मावशी
जळगाव,दि.4- वडिलांचे छत्र हरविलेल्या अमळनेर येथील मूळ रहिवासी व जळगावातील बाल निरीक्षण गृहात वाढीस लागलेल्या वैशाली दहीवदकर या अनाथ मुलीचे 4 मे रोजी थाटात शुभमंगल झाले. मुली ओङो वाटत असणा:या या काळात पालकत्व नसलेल्या मुलीचा एवढय़ा थाटात विवाह पाहून जळगावकर मान्यवरांनी या विवाह सोहळ्य़ाचे कौतुक केले.
वडिलांचे निधन झाल्यानंतर वैशालीच्या आईलाही मानसिक धक्का बसला व ती कोणालाही ओळखत नसल्याने नऊ वर्षाची असल्यापासून पालकत्व हरविलेल्या वैशालीचा गुरुवारी यावल तालुक्यातील चितोडा येथील दीपक सुभाष पाटील या मुलाशी विवाह झाला. सुभाष हा नाशिक येथे व्यवसाय करतो.
4 रोजी सकाळी 9 वाजता भास्कर मार्केटनजीकच्या बाल निरीक्षणगृहात वैशालीला हळद लागली. त्यानंतर लग्न घटिका समीप येत गेली व ज्या क्षणासाठी सर्वाचा उत्साह दिसून येत होता तो क्षण आला व दुपारी एक वाजेच्या सुमारास वैशालीचे लग्न लागले.
आशीर्वाद देण्यासाठी रिघ
लग्न लागल्यानंतर नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांची रिघ लागली होती. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनी विवाहस्थळी हजेरी लावून वधू-वरास आहेर देऊन आशीर्वाद दिले. या सोबतच बाल व निरीक्षण गृह संचालक मंडळ, अधीक्षक, जिल्हा महिला बालविकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बालकल्याण समिती पदाधिकारी यांच्यासह सामाजिक संस्था, शहर व परिसरातील मान्यवरांनी हजेरी लावून विविध वस्तू भेट दिल्या.
आत्मीयता, आपुलकीचे दर्शन
हा विवाह अनाथ मुलीचा आहे, असे येथे आल्यानंतर कोणालाही वाटत नव्हते. सर्वजण अत्यंत आत्मीयतेने व आपुलकीने वैशालीच्या विवाहासाठी राबत होते व येणा:यांचे स्वागत करीत होते.
संचालकांनी केले कन्यादान
लग्न लागल्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी येणा:यांची संख्या मोठी होती. त्यामुळे जवळपास एक ते दीड तास मान्यवरांचे येणे-जाणे सुरूच होते. त्यानंतर वैशालीचे कन्यादान करण्यात आले. संचालक उमेश पाटील यांनी हे कन्यादान केले.
आई-मावशीची उणीव भासू दिली नाही
मुलीची आई अथवा मावशी नसल्याची उणीव येथे भासू दिली नाही. अधीक्षिका जयश्री पाटील या वैशालीच्या आई तर सारिका मेतकर या मावशी झाल्या होत्या.