महिना उलटूनही पदोन्नत्यांचा विषय थंड बस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:19+5:302021-06-09T04:21:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या तीन ते चार वर्षांपासून आरोग्यसेवकांच्या, तसेच ग्रामसेवकांच्या पदोन्नती रखडल्या असून, याची प्रक्रिया पूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन ते चार वर्षांपासून आरोग्यसेवकांच्या, तसेच ग्रामसेवकांच्या पदोन्नती रखडल्या असून, याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने, पंधरा दिवसांत या पदोन्नती करण्याचे अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन महिना उलटूनही पूर्ण झालेले नसून, सदस्यांनी प्रश्न मांडल्यानंतर केवळ आश्वासनचे दिली जातात, असे एक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. यात आता १० जून रोजी पुन्हा स्थायी समितीची सभा असून, यात अधिकारी आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. गुरुवारी होणाऱ्या सभेत अजेंड्यावर मात्र, एकच विषय ठेवण्यात आला आहे.
आरोग्यसेवकांचे आरोग्य सहायक तर आरोग्य सहायकाचे पर्यवेक्षक अशी पदोन्नतीची प्रक्रिया आहे. मात्र, आरोग्य विभागातील या पदोन्नती गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडल्या आहे. याबाबत सदस्य मधुकर काटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने हा विषय रखडल्याचे उत्तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांनी दिले होते, तर पंधरा दिवसांत पदोन्नतींचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी दिले होते. ११ मे रोजी ही सभा झाली होती. १० जूनच्या सभेला दोन दिवस बाकी असतानाही याबाबत अद्यापही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे सदस्य केवळ प्रश्न मांडतात व ते तसेच अनुत्तरित राहातात, असे एकंदरीत चित्र या सभांमधून समोर आले आहे.
उद्या एकच विषय
जळगाव पंचायत समिती सभापतींसाठी शासकीय निवासस्थान नसल्याने, त्यांना खासगी जागेत राहण्यासाठी भाडेमंजुरीचा प्रस्ताव या गुरुवारी होणाऱ्या ऑनलाइन सभेत ठेवण्यात येणार आहे. हा एकमेव विषय अजेंड्यावर असून, आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्या आधी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जलव्यवस्थापन समितीची सभा होणार आहे.