समांतर रस्ते कृती समितीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा, जळगावात पराग कोचुरे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:33 PM2018-02-12T12:33:29+5:302018-02-12T12:33:59+5:30
जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षकांची चौकशी करून कार्यवाही व्हावी
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १२ - जमावबंदी आदेशाचे पालन न करता १० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या बेकायदा महामार्ग रोको आंदोलन प्रश्नी समांतर रस्ते कृती समिती व महापौर, नगरसेवक तसेच संबंधित सामाजिक, शैक्षणिक संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पराग कोचुरे यांनी केली आहे. या संबंधी त्यांनी पंतप्रधान कार्यालय, उच्चन्यायालय, शिक्षण विभाग यांना पत्र पाठविले असून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचीदेखील सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जमावबंदी लागू असताना १० जानेवारी रोजी शहरातील अजिंठा चौफुली येथे समांतर रस्ते कृती समितीने समांतर रस्त्यांसाठी केलेले आंदोलन हे बेकायदेशीर असून या आंदोलनात सहभागी समांतर रस्ते कृती समितीसह संस्था, लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच विद्यार्थी सुरक्षिततेचा विचार न करणाºया शाळा व्यवस्थापनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गेल्या महिन्यातच पराग कोचुरे यांनी केली होती.
पंतप्रधान कार्यालय, उच्चन्यायालय, शिक्षण विभाग यांना पत्र पाठविले असून त्यात पुन्हा ही मागणी केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, या आंदोलनामुळे समांतर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला, हे समांतर रस्ते कृती समितीचे म्हणणे खोटे आहे. त्या काळात जमावबंदी लागू असताना या आंदोलनास परवानगीदेखील नाकारण्यात आली होती, मात्र समितीने जनतेला भडकावून हे बेकायदेशीर आंदोलन केल्याचा आरोप केला आहे.