फायर ऑडिट सादर करा- भुसावळ पालिकेचे सर्व यंत्रणांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 03:10 PM2021-01-14T15:10:15+5:302021-01-14T15:10:31+5:30
भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पालिकेने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
भुसावळ : भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
भंडारा येथील नवजात शिशु कक्षात आग लागून १० शिशूंचा जीव गेला. त्यानंतर पुन्हा राज्यभरात दवाखान्यातील आगीबाबत सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशी घटना घडल्यास तातडीने उपाययोजना करता याव्यात म्हणून पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, इस्पितळे, वाणिज्य, व्यापारी संकुले, लॉजिंग, हॉटेल्स, मोठे व्यावसायिक कार्यालय याठिकाणी आग प्रतिबंधक व जीवनसुरक्षा उपायोजना अधिनियम अंतर्गत आग प्रतिबंधक उपाय योजना पुरेसा प्रमाणात प्रभावीरित्या राबवाव्या. तसेच जानेवारी ते जुलै वर्षातून दोनदा अशा अग्नी सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण( फायर सेफ्टी ऑडिट) करून घेणे बंधनकारक आहे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी मालमत्ताधारकांनी आपल्या येथील इमारतीचे अग्नी सुरक्षव्यवस्थाचे परीक्षण करून त्याबाबतचे प्रमाणपत्र अग्निशामक विभागात सादर करावे, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.