महसूल बुडवून गौण खनिजाचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 09:38 PM2019-10-27T21:38:44+5:302019-10-27T21:38:50+5:30
विना लिलाव हम ठेकेदार : साकेगाव परिसरात प्रशासनाला आव्हान
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे विना लिलाव हम ठेकेदार.. अशी स्थिती आहे. महसूल न देता वाटेल त्या ठिकाणी गौण खनिजाचे उत्खनन करून महसूल प्रशासनाला आव्हान दिले जात आहे.
साकेगाव शिवारातील वाघुरपात्र, वन विभाग हे गौण खनिजाचे स्त्रोत आहे, याठिकाणी गौण खनिजाची तस्करी करणारे बिनधास्त उत्खनन करीत आहेत.
वाघुर नदीपात्राजवळ गोंभी रस्त्यावर कब्रस्तानच्या जागेमध्ये वाळूतस्करांनी नियम धाब्यावर बसवून वाट्टेल त्या ठिकाणी उत्खनन करून वाळूची तस्करी सुरू केली आहे. यासाठी पद्धतशीरपणे आधी चोर मार्ग बनविण्यात आला असून या कच्च्या मार्गावरुन रात्री अकरानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत अंधारामध्ये वाळू तस्करीची काम सर्रासपणे सुरू असतात?
महसूल प्रशासन व्यस्त असल्याने घेतला फायदा
विधानसभा निवडणुकीमुळे महसूल प्रशासन निवडणुकीच्या कार्यात व्यस्त असताना व त्यानंतर लागोपाठ दिवाळीच्या सुट्यांचा फायदा घेत वाळूतस्करांनी ‘विना लिलाव हम ठेकेदार’ अशीच स्थिती येथे केली आहे. यामुळे शासानाचे मोठे नुकसान होत आहे.
स्वयंघोषित ठेकेदार कोण ?
गावामध्ये अनेक ठिकाणी गौन खनिजाच्या ठिकाणी स्वत: ला मालक दाखवून वाळू व्यवसाय करणारा स्वयंघोषित ठेकेदार कोण ? त्या ठेकेदारास कोणाचे आशीर्वाद आहे? याचा छडा लागला पाहिजे अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.