प्रभात चौकातून दीड महिन्यात सुरू होणार भुयारी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:52 PM2019-12-22T23:52:16+5:302019-12-22T23:52:59+5:30

दोन ते तीन दिवसात अग्रवाल चौकातही होणार काम सुरू

Subway journey will begin in the morning and one and half months from morning | प्रभात चौकातून दीड महिन्यात सुरू होणार भुयारी प्रवास

प्रभात चौकातून दीड महिन्यात सुरू होणार भुयारी प्रवास

Next

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातंर्गत प्रभात चौकात भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला रविवारी सकाळी सुरूवात झाली. दीड महिन्यात हा भुयारी मार्ग पूर्ण होऊन वाहतुकीला खुला होणार असल्याचे सांगितले जात आहे. गुजराल पेट्रोलपंप, दादावाडीनंतर प्रभात चौकात सुरू झालेल्या या भुयारी मार्गाच्या कामामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून अपघात टळण्यासही मोठी मदत होणार आहे.
शहरातून जाणाºया महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे या महामार्गाच्या तसेच समांतर रस्त्याच्या कामासाठी शहरात वेगवेगळ््या संघटनांकडून विविध आंदोलने झाली. मोठ्या प्रतीक्षेनंतर महामार्ग चौपदरीकणास मुहूर्त लागला व रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरू झाले. याच चौपदरीकरणांतर्गत शहरातील ८ कि.मी. लांबीच्या मार्गावर तीन भुयारी मार्ग असून त्यात गुजराल पेट्रोलपंपजवळ पहिल्या भुयारी मार्गाचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. त्यानंतर प्रभात चौकात होणाºया भुयारी मार्गासाठी १० डिसेंबर रोजी तेथील सिग्नल तोडण्यात येऊन हा परिसर मोकळा करण्यात आला.
वाहने वळविली
सिग्नल तोडल्यानंतर १२ दिवसांनी प्रभात चौकात प्रत्यक्ष भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. रविवारी सकाळी महामार्गावर बॅरिकेटस् लावून महामार्गावर खोदकाम करण्यात येत आहे. चौकात महामार्गाच्या आजूबाजूने वाहने वळविली असून या ठिकाणी वाहनांचा वेग कमी होऊन कोंडीदेखील होत आहे.
दीड महिन्यात होणार काम पूर्ण
प्रभात चौकात सुरू करण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा भुयारी मार्ग अग्रवाल हॉस्पिटल चौकानजीक निघणार आहे. १२ मीटर रुंद, ६ मीटर उंच व १९ मीटर लांब असा हा भुयारी मार्ग राहणार आहे. दोन व्हेईकल ब्लॉक या ठिकाणी राहणार असून दीड महिन्यात या भुयारी मार्गातून वाहने येणे-जाणे सुरू होणार असल्याचाही दावा अधिकाºयांनी केला आहे.
दादावाडीतील कामामुळे प्रभात चौकात विलंब
प्रभात चौकातील सिग्नल १० डिसेंबर रोजी काढण्यात आल्यानंतर लगेच येथे भुयारी मार्गासाठी खोदकाम करण्यात येणार होते. मात्र दादावाडी येथे सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची पातळी (लेव्हल) जास्त झाल्याने तेथे पुन्हा खोदकाम करावे लागले. त्या कामामुळे प्रभात चौकातील काम लांबले.
अग्रवाल चौकातील कामही दोन-तीन दिवसात
प्रभात चौकात काम सुरू झाल्यानंतर आता दोन-तीन दिवसात अग्रवाल हॉस्पिटल चौकातही भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या कामासाठी तेथे सपाटीकरणदेखील करण्यात आले आहे.
प्राधान्यक्रमाने विद्युत खांब हटविणार
चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविण्याकरिता महावितरणने काढलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्यापही खांब हटविण्यास सुरुवात झालेली नाही. महामार्गासाठी ज्या ठिकाणी जास्त अडथळा ठरेल तेथील खांब प्राधान्याक्रमाने काढले जाणार असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता (जळगाव शहर) संजय तडवी यांनी सांगितले.
कालिंका माता मंदिर ते खोटे नगर पर्यंत खांब हटवून दुसरीकडे स्थलांतरित केले जाणार आहेत. कालिकामाता मंदिर ते खोटेनगर दरम्यान महावितरणची ३३ केव्ही व ११ केव्हीची मुख्य वाहिनी आहे. या विद्युत वाहिनीवर जोडणीधारकांमध्ये घरगुती ग्राहकांसह औद्योगिक ग्राहकांचाही समावेश आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी येथील विद्युत खांब अडथळा ठरत असल्याने टप्प्या-टप्प्याने हे विद्युत खांब हटविण्यात येणार आहेत. याचठिकाणी नवीन विद्युत लाईनही उभारण्यात येणार असून या कामासाठी महावितरणला ४ कोटींचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे.

असा आहे भुयारी मार्ग
- रुंदी - १२ मीटर
- उंची - ६ मीटर
- लांबी - १९ मीटर
- व्हेईकल ब्लॉक - २

प्रभात चौकातील भुयारी मार्गासाठी खोदकामाचे काम सुरू झाले असून दीड महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या सोबतच दोन ते तीन दिवसात अग्रवाल चौकातही भुयारी मार्गाचे काम सुरू होईल.
-भूपेंदर सिंग, अभियंता, ईपीसी कंपनी

Web Title: Subway journey will begin in the morning and one and half months from morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव