Coronavirus: ...अन् १८ दिवस ऑक्सिजनवर असलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्यानं कोरोनाला हरवलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:20+5:302021-05-08T17:17:26+5:30

दुसऱ्या लाटेत लहान मुले गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बालकांमध्येही अगदी गंभीर स्वरूपाची लक्षणे जाणवू लागली आहेत. यात प्रामुख्याने श्वास घ्यायला त्रास होणे हा एक गंभीर त्रास अनेक बालकांना होताना दिसत आहे.

Coronavirus: one-year-old boy fights back covid 19 after 18 days on oxygen support | Coronavirus: ...अन् १८ दिवस ऑक्सिजनवर असलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्यानं कोरोनाला हरवलं!

Coronavirus: ...अन् १८ दिवस ऑक्सिजनवर असलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्यानं कोरोनाला हरवलं!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या गंभीर लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित एक वर्षीय चिमुकल्याने १८ दिवस ऑक्सिजनवर राहून मृत्यूशी यशस्वी झुंज दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला या एक वर्षीय बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले आहे. त्याला शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देखील देण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेत लहान मुले गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बालकांमध्येही अगदी गंभीर स्वरूपाची लक्षणे जाणवू लागली आहेत. यात प्रामुख्याने श्वास घ्यायला त्रास होणे हा एक गंभीर त्रास अनेक बालकांना होताना दिसत आहे. अशाच स्थितीत बोदवड तालुक्यातील जुनोने येथील एक वर्षीय बालकाला कोरोनाचे निदान झाले होते. त्याला १७ एप्रिल रोजी ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करीत असताना त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. त्याच्या प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स-रे याद्वारे त्याच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी प्रयत्न केले.

तब्बल १२ दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाल्याने वैद्यकीय पथकाला यश आले. सलग १८ दिवस ऑक्सिजन व त्यानंतर औषधोपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास २३ दिवसांनी बालरोग विभागाला यश आले. डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता, वॉर्ड इन्चार्ज संगीता शिंदे यांनी उपचार केले. शुक्रवार ७ मे रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या उपस्थितीत बालकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

दोन महिन्यांत ३८ बालकांवर उपचार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात मार्च ते मे या दोन महिन्यांत तब्बल ३८ कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर उपचार झाले आहेत. त्यात गंभीर १४ तर २४ इतर बालकांवर उपचार झाले. यात ३० बालकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत ६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून, त्यात २ गंभीर आहे. बालकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवली तर उशीर न करता तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

Web Title: Coronavirus: one-year-old boy fights back covid 19 after 18 days on oxygen support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.