असे ‘मामा’ यापुढे पुन्हा होणे नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:25 AM2018-06-13T00:25:43+5:302018-06-13T00:25:43+5:30
भय्यूजी महाराजांच्या ‘भाची’ला आठवणींचा हुंदका : महाराज खान्देशी खाद्य पदार्थांचे चाहते
जिजाबराव वाघ ।
चाळीसगाव (जि.जळगाव) : ‘श्यामल मी औरंगाबादला चाललोय. वाटेत तुझ्या घरी जेवण घेईल. छान पिठलं आणि भाकरी बनव... ‘मामा भय्यूजी महाराजांचा फोनवरचा हा निरोप ऐकला की, सगळं घर आनंदून जायचं. आता पुन्हा असा फोन येणार नाही. भय्यूजी महाराजांच्या आठवणींचा बांध फुटला अन् श्यामल जाधव यांना हुंदका अनावर झाला. भय्यूजी महाराज आणि श्यामल जाधव यांचे मामा - भाची असं नातं. महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण जाधव कुटूंबिय सुन्न झाले आहे.
चाळीसगावच्या हनुमानवाडीत राहणाऱ्या श्याम आणि श्यामल जाधव यांच्या कुटुंबाशी भय्यूजी महाराजांचे गेल्या अनेक वर्षापासून ऋणानुंबध आहेत.
२५ ते ३० वेळा भय्यूजी महाराज चाळीसगावी आपल्या भाचीला भेटण्यासाठी येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे मुक्काम करुन महाराजांनी येथे गप्पांच्या मैफीलीही रंगवल्या आहेत. चाळीसगावात त्यांच्या ‘सूर्योदय’ परिवाराचे ३०हून अधिक साधक आहेत. त्यांच्यामार्फत परिसरात अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात.
सांगोल्यात झाली नाती घट्ट
भय्यूजी महाराज यांची एक बहिण विजयालक्ष्मी साळुंखे ह्या सांगोल्यात (जि.सोलापूर) राहतात. विजयालक्ष्मी ह्या श्यामल जाधव यांच्या सख्ख्या काकू. बालपणापणासूनच भय्यूजी महाराज सांगोल्यात बहिणीकडे येतं. श्यामल यांचा विवाह चाळीसगाव येथील श्याम जाधव यांच्याशी झाल्यानंतर भय्यूजी महाराज आवर्जून येथे यायचे. मराठवाड्यात जाताना चाळीसगाव येथे भाचीच्या हातचे जेवण घेतल्याशिवाय महाराजांचा पुढचा प्रवास सुरू होत नव्हता.
भय्यूजी महाराज यांच्याशी आमचे नातेसंबंध असले तरी ते आमच्या परिवाराचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत
- श्यामल व श्याम जाधव, चाळीसगाव.