अशी असते मापांची दुनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 02:25 PM2019-06-07T14:25:32+5:302019-06-07T14:25:47+5:30
वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये मापं ही वेगवेगळी असतात. बाजारात कोठे तर ५० ग्रॅमपासून त्यापुढील मापं, तर डाळ्या-मुरमुरे विक्री करणारे समाजबांधव यांच्याकडे पारंपरिक लोखंडी तसेच पितळ्याच्या भांड्यासारखी मापं दिसतात. या मापांचा दुनियेचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अशोक कौतिक कोळी यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत घेतलेला आढावा.
पूर्वी धान्य हेच मुख्य विनियोगाचे साधन होते. कुठलाही व्यापार हा धान्याच्या मोबदल्यात केला जायचा. त्यामुळे धान्य आणि इतर वस्तू मापनासाठी शेर, पावशेर, अस्तेर ही मापनाची मूलभूत यंत्रणा सिद्ध झाली. तिचा वापर धान्यासोबतच इतरही वस्तू मापनासाठी अर्थातच होऊ लागला. त्याला सोने, चांदी, दूध हेही अपवाद नव्हते. इंग्रजी मेट्रीक पद्धतीची वजनमापे अवतरण्याअगोदरपर्यंत हीच मापनपद्धती सर्वत्र वापरात होती.
आजही ती वापरात आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मी धान्य बाजारात गेलो. आठवडी बाजारात धान्य व्यापाऱ्यांची स्वतंत्र गल्ली असते. त्या तिकडे मी गेलो. धान्य व्यापाऱ्यांनी टोपल्यातून, गोणपाट पोत्यातून काही छोट्या पिशव्यातून धान्याची मांडामांड केलेली होती. त्यात ज्वारी, गहू, तांदूळ व तूर-उडीद, मूग, हरभरा इत्यादी डाळींचा, कडधान्याचा, भरडधान्याचा समावेश होता. येथील विक्री व्यवस्था-मापन व्यवस्था मी जाणून घेतली.
तेथील मूलभूत माप होते शेर, त्यानंतर आधेलं. ही लोखंडी धातूपासून बनवलेली भांड्याच्या आकाराची गोलाकार मापे होती. त्यामध्ये धान्य भरून मापले जात होते. पुढील माप त्या पटीत ठरत होते. धान्य मोजण्याचे पहिले माप शेर, त्यानंतर आधेलं, चौथं, डोळं, पायली आणि पोतं, पोतं म्हणजे एक क्विंटल. शेर एक किलोचा, आधेलं दोन शेराचं, चौथं दोन आधेलंचं, डोळ्यामध्ये चार चौथे आणि चार डोळ्याचं पोतं.
धान्य मोजण्याची शेराच्या खालची मापेही आढळून आली. त्यासाठी मला जावे लागले भोई बाजारात. आमच्या जामनेर परिसरात भोई लोकांचा चणे, फुटाणे, दाह्या, मुरमुरे विकण्याचा व्यवसाय आहे. शेव-दाह्या-मुरमुरे हा आमच्याकडचा बाजारातील खाऊ! याशिवाय बाजाराला पूर्णत्व प्राप्त होत नाही. हा खाऊ हलकापुलका व खायला चटकदार असल्याचे सगळ्यांनाच आवडतो, चालतो.
भोई लोकांकडील मापांची नावे मजेशीर वाटली. त्यांना खास बोलीभाषेचा लहेजा आहे. ह्या मापांचा आकारही धारण करणाºया भांड्यासारखा आहे. त्यांची विशेषत: म्हणजे ही मापे पितळ व तांब्यापासून बनवलेली होती. भोई लोकांचे सगळ्यात वरचे माप शेर आहे. धान्य बाजारातील शेर येथेही मला भेटला. शेराचा उपयोग येथे मुरमुरे मोजून देण्यासाठी होत होता. भाजलेल्या तांदळापासून बनविलेले कुरकुरीत मुरमुरे... त्यात टाकण्यासाठी दाह्या, फुटाणे, शेव येथे उपलब्ध होते. ह्या चिजा मोजून देण्यासाठी इथे होतं नकटं, चटकं, आठकं, पावशेर, आस्तेर आणि शेवटी शेर !
भोई बाजारातून मी वानसामानाच्या दुकानांकडे मोर्चा वळविला. तिथे संसारोपयोगी खाद्यपदार्थांची रेलचेल होती. तेथील मापांची उच्चार पद्धती ही खास आमच्या स्थानिक तावडी बोलीतील होती. ‘छटाक’ हे तेथील आधारभूत माप. त्यानंतर आतपाव, कच्चा पाव, पाव, अर्धा किलो, किलो असा हा प्रवास होता. येथील मापे वजन आधुनिक मेट्रीक पद्धतीची होती. ग्रॅमच्या पटीत. वजनकाटाही होता. वजनकाट्याच्या एका पारड्यात लोखंडी वजन माप तर दुसºया पारड्यात मोजून द्यावयाची वस्तू.
येथील मापांचे प्रमाण असे होते- छटाक म्हणजे ५० ग्रॅम, २० ग्रॅमचा अर्धा छटाक, आतपाव म्हणजे शंभर ग्रॅम, दोनशे ग्रॅमचा कच्चा पाव तर २५० ग्रॅमचा पक्का पाव, छटाक, आतपाव, शेर, पावशेरही खास आमच्या प्रदेशातील मापन पद्धती आहे, असे माझ्या लक्षात आले. संपूर्ण बाजारभर ह्या शब्दांचा वापर होता. आमूक भाजी काय पाव? मुरमुरे काय शेर? शेव काय छटाक? आतपाव तेल केवढ्याचं? कच्चा पाव मच्छी कितीला? पक्का पाव मटण केवढ्याचं? असे सूर सर्वत्र उमटून होते.
दूध, तेल, घासलेट यासारखे द्रवरूप पदार्थ मोजण्यासाठीही हीच नामावली होती. मापांचा आकार भलाई वेगळा असेल. बाजारात काही विक्रेते आपल्या वस्तू नगावर, वाट्यावरही विकताना आढळून आले. कापड गल्लीत हात, वार, फुटावर कापड मापल्या जात होते तर खारासाठीच्या केºह्या फाड्यावर विकल्या जात होत्या.
अशी ही मोजमापांची दुनिया अनोखा आनंद देऊन जात होती. आठवडे बाजारातील ही रित खूपच पुराणी होती. तिला ना कुठली आॅनलाईन शॉपिंग बाधू शकत होती ना जागतिकीकरणाची कुठली व्यवस्था झाकाळू शकत होती. शतकानुशतके चालत आलेली ही मापन पद्धती अबाधीत असल्याचा सार्थ अभिमान वाटू लागला. (उत्तरार्ध)
-डॉ.अशोक कौतिक कोळी, जामनेर, जि.जळगाव