वडजी येथे झोपडीला अचानक आग, संसार जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 23:14 IST2021-06-02T23:14:31+5:302021-06-02T23:14:46+5:30
भडगाव तालुक्यातील वडजी येथील एका भिल्ल आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागली.

वडजी येथे झोपडीला अचानक आग, संसार जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : तालुक्यातील वडजी येथील एका भिल्ल आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागून झोपडी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. तलाठी विलास शिंदे यांनी सुमारे ७० हजारांचे नुकसान पंचनाम्यात नमूद केल्याचे सांगितले. प्रशासनाने या कुटुंबाला तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वडजी येथे भिल्ल वस्तीतील रहिवाशी मोहन भिल्ल याच्यां राहत्या झोपडीला अचानक आग लागली. त्यात झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. यात सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी विलास शिंदे यांनी दिली. पती पत्नी दोघंही मजुरीसाठी बाहेर कामाला गेले होते. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजु शकले नाही. तलाठी विलास शिंदे यांनी घटस्थळी येऊन पंचनामा करून अहवाल तहसिल कार्यालयात सादर केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या जिकरीने ही आग आटोक्यात आणली. यावेळी वडजी ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान पाटील, सुधाकर पाटील, स्वदेश पाटील यांनी भेटून मदत मिळवून देण्थासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सुधाकर पाटील यांनी तहसिलदार सागर ढवळे यांना यासंदर्भात माहीती देऊन तत्काळ मदत देण्यासंदर्भात विनंती केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदत लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले तर महसुल विभागाकडून या कुटुंबाला किराणा उपलब्ध करू देऊ, असे सांगितल्याची माहिती सुधाकर पाटील यांनी दिली.
समोर आग अन् डोळ्यात अश्रू
अन्नधान्यासह कपडे, टीव्ही, भांडे आदी वस्तू जळाल्याने या कुटुंबाचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. जळालेला संसार पाहून सुनंदा भिल्ल यांच्या डोळ्यात अश्रूनी घर केले होते. समोर आगीत जळून गेलेला संसार आणि डोळ्यात अश्रू असे हृदयस्पर्शी चित्र यावेळी बघायला मिळाले.