सफाई कामगारांचे अचानक कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 07:45 PM2018-09-01T19:45:29+5:302018-09-01T19:46:22+5:30
बोदवड येथे पगारवाढीसाठी प्रशासनाने शब्द न पाळण्याने सफाई कामगार संतप्त
बोदवड, जि.जळगाव : पगारवाढीसंदर्भात प्रशासनाने शब्द न पाळण्याने संतप्त झालेल्या येथील नगरपंचायतीच्या सफाई विभागातील कामगारांंनी शनिवारी अचानक कामबंद आंदोलन सुरू केले. यात ५४ सफाई कामगार सहभागी झाले आहेत. याबाबतचे पत्र सफाई कामगारांनी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना दिले आहे.
बोदवड नगरपंचायत झाल्यापासून शासकीय दर पत्रकाप्रमाणे पगार मिळत नाही. परिणामी तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा हाकणे जिकिरीचे जात आहे. पगारवाढ करण्याची मागणी गत मे महिन्यात लेखी निवेदनाद्वारे केली होती. यावर आॅगस्टपासून पगारवाढ करण्याचे आश्वासन मिळाले होते, परंतु याला अद्यापही न्याय न मिळाल्याने अखेर सफाई कामगारांंनी शनिवारपासून अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे आज पहिल्या दिवशी सफाईची कामे ठप्प झाली.
सफाई मुकादम म्हणतात...
याबाबत सफाई मुकादम मनोज छपरीबद यांची प्रतिक्रिया घेतली असता, पगारवाढीचे आश्वासन देऊनही ती केली नाही. आमचे रामदेव बाबा उपवास सुरू असून, या उत्सव काळातही तुटपुंज्या पगारावर भागवणे कठीण जात आहे. पगारवाढ दिली जात नसल्याने नाईलाजाने संप करीत आहोत, असे सांगितले.
मुुख्याधिकारी म्हणतात...
मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता, कोणतीही पूर्व सूचना न देता संप पुकारला आहे. हा बेकायदेशीर प्रकार आहे. त्यांच्या पगारवाढीच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. शासकीय निर्णयानुसार मागण्या पूर्ण करू, असे सांगितले.