सुफी साधू - फकीर

By admin | Published: May 20, 2017 01:06 PM2017-05-20T13:06:38+5:302017-05-20T13:06:38+5:30

परमात्म तत्वाच्या संबंधीचे सत्यज्ञान सुफी धर्म होय

Sufi monk - Mystic | सुफी साधू - फकीर

सुफी साधू - फकीर

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 20 - सुफी हे इस्लामी रहस्यवादी साधू होत. सुफींचे तत्वचिंतन तसव्वुफ. इस्लामी साधकांनी वेगवेगळ्या प्रकारे याचे वर्णन केलेय. परमात्म तत्वाच्या संबंधीचे सत्यज्ञान सुफी धर्म होय.  स्वार्थत्याग करून परमेश्वराप्रती समर्पण भाव हा सूफी विचार आहे. अमंगलाला सुफी सुधारक मागे ढकलतात. हा एक साजरा सुंदर असा ईश्वरी व्यवहार आहे. जगण्याची अभिराम शैली आहे. विधिनिषेधांपासून मुक्तता सुफी विचार शिकवतो.
सुफी हे इस्लामी संत मत आहे. पर्शियन भाषेत तसव्वुफ म्हणजे सुफी मत होय. सुफी या शब्दाची व्युत्पत्ती विविधांगी आहे. विद्वानांच्या ठायी एकमत नाही. सुफी शब्दाच्या मुळाशी अरबी शब्द आहे सुफ. सुफ म्हणजे लोकर. सुफी एकांतवासी साधक असत. लोकरीचे वस्त्र त्यांच्या साधेपणाचे प्रतीक आहे. हा विलासितेपासून लांब राहणा:या साधुंचा पोशाख. काही पंडितांनी ‘सुफा’ या शब्दापासून सुफी शब्दाचा विकास मानला आहे. सुफा म्हणजे पवित्र वा पावन. काहींचे निरुपण मात्र वेगळे आहे. मुहम्मद पैगंबराच्या कार्यकाळात मदिनाच्या मशिदीसमोर एका बाकावर बसणारे भक्त ‘अहल-अल-सुप-फाह’ म्हणवले जात. सूफ-फाह-शब्द सूफी शब्दाचे मूळ असल्याचेही काहींचे मानने आहे. काही संशोधकांचे मत वेगळे आहे. ‘सप-फे-अव्वल’ याचा अर्थ आहे प्रार्थनारत भक्त निष्ठावंतांची पहिली रांग. एक भटकी जात होती ‘बनू सूफा’. यातून हा शब्द विकसला असेही एक मत आहे. ग्रीक भाषेतल्या ‘सोफिरता’ शब्दापासून सूफी शब्द बनला. यातून या शब्दाचा अर्थ विस्तार होत पुढे सूफी म्हणजे विचारवंत असेही निष्पन्न झाले. ही भक्तमंडळी निस्पृह होती. साधेपणाचे व्रत अंगिकारल्यामुळे त्यांनी स्वेच्छेने निर्धनतेला वरले होते. प्रापंचिक मोह त्यांना नव्हता. केवळ बाह्य पोशाख साधेपणाचा नव्हता तर आंतरिक मनोवृत्ती धगधगत्या वैराग्याने प्रज्वलित होत्या. ही साधक मंडळी प्रेममगA होती. धन वैभवापासून लांब होती. जाडय़ाभरडय़ा लोकरीची वस्त्रे ते वापरत. ही बाह्य खूण होती. ते कांबळे पांघरत असत.
हे ईश्वरोन्मुख साधक प्रपंचापासून दूर रहात. तहानभूक सहन करत. हे सात्विक शैलीचे जीवनधर्मी होते.   बाह्याचारांपासून ते विरक्त असत. अंत:करणाच्या पावित्र्याला यांनी मोलाचे मानले. मुस्लीम एकेश्वरवाद ते भारतीय अद्वैतवाद अशी ही सूफी साधनेची यात्रा आहे. सूफी साधनेची यात्रा चार मुक्काम पार करते. या चार अवस्था म्हणजे शरीयत, तरीकत, मारीकत आणि हकीकत होय. भारतीय परंपरा म्हणजे कर्मकांड, उपासना कांड, ज्ञानकांड आणि सिद्धावस्था. या उत्तरोत्तर विकसित अवस्था आहेत. यातून साधकाचा विकास घडून येतो.
शरीयत ही सूफी साधकांची आरंभिक अवस्था आहे. या अवस्थेत मुस्लीम आणि सूफी दोघांची रचना सारखीच आहे. या नियमावलीचे पालन प्रेम जागवते. अलौकिक अशा प्रियतमाचा शोध सुरू होतो. या वाटचालीत साधक मोमीन म्हणजे प्रणयी ठरतो. ईश्वराच्या मार्गातल्या बाधक तत्त्वांपासून त्याला लांब रहावे लागते. याला ‘तोबा’ म्हणायचे. या बाधांशी सततचा मुकाबला करायचा असतो. हे जहद होय.  ईश्वराच्या आदेशाचे म्हणजे रिजाअचे पालन करावे लागते. यासाठी ईश्वराचे भय म्हणजे खौफ बाळगावे. या भयासबोत ईश्वरावर श्रद्धाही हवीय. उदरभरणासाठी भटकंती म्हणजे तक्क्लुय नकोय. तथ्स्थातापूर्वक ईशध्यान म्हणजे ‘रजा’ करावे. निरंतर साधना आणि अखंड ध्यान धरावे लागते. यातून ईश्वरविषयक मुहब्बत म्हणजे प्रीत उपजते. प्रीत उजली की बनला मोमीन, सुफी हा सात्विक असतो. तरीफत ही मुस्लीम साधकाची दुसरी अवस्था आहे. सुफी साधूची ही पहिली अवस्था होय. यातून ज्ञानाचा लाभ होतो. यात चिंतनावर भर असतो. हे ज्ञान वासनात्मक नाही. ही प्रज्ञा जागरणाची अवस्था आहे. कुणाच्या अनिष्टाचा यात विचार नाही. ही सत्यानुभवाची अवस्था होय. मारीफत ही ज्ञानदशा आहे. भक्ताला परमात्म सत्तेचा बोध होतो. ईश्वरीय सत्तेच्या रहस्यमयतेचे आकलन होते. या अवस्थेला ‘हाल’ म्हटले जाते. आता सूफी साधक ‘आरिफ’ बनतो. हा ईश्वरी अनुकंपतेचा कृपाप्रसाद होय. यासाठी शरीयत आणि तरीकतची कवायत करायची आवश्यकता उरत नाही. ही कृपा हा प्रसाद असतो.
हकीकत हे काही साधन नव्हे हे साधकाची अनुभवावस्था होय. या अनुभव प्राप्तीसाठी सालिक सारी योजना आखतो. या अवस्थेत साधक अनहलक अशी घोषणा करतो. ‘अहं ब्रrाùस्मि’ हा घोष करतो. परमसत्तेचे ्रखरेखुरे ज्ञान त्याला लाभते. साधक ब्रrादशेला पोहोचतो. ही अवस्था समर्पणाची म्हणजे फनाची अवस्था होय.या अवस्थेला मकाम असेही म्हणतात. ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपूटी मावळते. एकरुपता साधली जाते. आत्मसाक्षात्कार घडतो. साधक पूर्ण दशेला पोहचतो. ब्रrादशेला पोहोचतो. साधकाचे आत्मतत्व ईश्वरठायी निवास करू लागते. हे सूफी साधकाचे परम लक्ष्य असते. हे म्हणजे बका. फना स्थितीत साधकाचा अहंभाव लयाला जातो. साधक द्वंद्वांपासून मुक्त होतो. त्याची प्रीयतमाशी लय साधली जाते. ही दशा बकाची असते. सूफी कवी या चारही अवस्थांचे वर्णन करतात. साधनेचे चार सोपान मानतात. चार बसेरे म्हणजे मुक्कामाची चार ठिकाणे होत. सूफी कवी मलिक मुहंमद जायसी यांच्या ‘पद्मावत’ आणि ‘अखरावट’ या काव्यग्रंथामधून हे उल्लेख मनोरम पद्धतीने आलेले आहेत. सूफी चिंतक या चार अवस्थांच्या सोबत चार लोकांचीही चर्चा करतात. हे चार लोक नासूत, मलकृत, जबरुत आणि लाहूत या नावाने परिचित आहेत. नासूत म्हणजे नरलोक. मलकूत म्हणजे देवलोक. जबरुत म्हणजे ऐश्वर्यलोक आणि लाहूत म्हणजे माधुर्यलोक होय. काही लोक हाहूतचीही चर्चा करतात. याचा अर्थ सत्यलोक होय. साधक या लोकांच्या ठायी विराम करतो. परब्रrातत्त्वाच्या ठायी लीन होतो. प्रापंचिक बंधनातून मुक्त होतो. या चार लोकांना जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया असेही म्हणता येईल. हाहूत ही तुरियातीत अवस्था होय. सूफी मतानुसार, अबूदिया, इश्क, जहद, म्वारिफ, वज्द, हकीकी, वस्ल किंवा बका ही प्रतीके आहेत. सूफी कवितेतील नायक हा मार्ग पत्करतात. हकीकतर्पयत पोहोचतात. नायिकेची म्हणजे परब्रrातत्त्वाची प्राप्ती करतात. ईशतत्त्वाशी एकरुप होतात. त्यांना शाश्वत बका आनंदाची उपलब्धी  होते.
- प्रा.डॉ. विश्वास पाटील

Web Title: Sufi monk - Mystic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.