प्रेमविवाहाच्या भीतीने अल्पवयीन मुलीचा साखरपुडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:45+5:302021-01-13T04:38:45+5:30
जळगाव : प्रेम विवाह होण्याच्या भीतीने आई, वडील व मामा, मामी यांनी जबरदस्तीने साडे पंधरा वर्षाच्या मुलीचा रविवारी साखरपुडा ...
जळगाव : प्रेम विवाह होण्याच्या भीतीने आई, वडील व मामा, मामी यांनी जबरदस्तीने साडे पंधरा वर्षाच्या मुलीचा रविवारी साखरपुडा केला. २४ जानेवारी लग्नाची तारीखही निश्चित केली. या प्रकाराला विरोध असल्याने मुलीने साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मामा, मामीच्या घरुन या मुलीने पळ काढला व थेट सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करुन या मुलीला शनी पोलिसांच्या माध्यमातून बालनिरीक्षणगृहात पाठविले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका खेडेगावातील साडे पंधरा वर्षाच्या मुलीच्या पालकांनी रविवारी कासमवाडीतील तरुणासोबत जबरदस्तीने साखरपुडा केला. त्यानंतर २४ जानेवारी रोजी लग्न निश्चित केले. ही मुलगी प्रेमविवाह करेल, अशी भीती पालकांना होती, त्यामुळे त्यांनी तातडीने साखरपुडा व लग्न करण्याचा निर्णय घेतला. कायद्यानुसार १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येत नसल्याची जाणीव या मुलीला होती, त्यामुळे तिने शहरात एका रिक्षावर ‘महिलांच्या हक्काचा एक हात तुझ्या मदतीसाठी’ असे फलक वाचले होते व त्या फलकावर इंदूबाई बहुउद्देशिय महिला मंडळ, जळगाव असा उल्लेख व सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांचा क्रमांक होता. या मुलीने याच क्रमांकावर संपर्क साधून शनी पेठेत मंगला सोनवणे यांची भेट घेतली. त्यांनी जननायक फांउडेशनचे फरीद खान व प्रतिभा भालेराव यांच्या मदतीने मुलीचे समुपदेशन केले. त्यानंतर शनी पेठ पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या मदतीने सायंकाळी बालनिरीक्षणगृहात दाखल केले.