नवीदाभाडीतील पीडितेच्या आत्महत्या प्रकरणात कलम वाढविण्याच्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:06 PM2021-02-26T22:06:00+5:302021-02-26T22:07:03+5:30

पत्रकार परिषद : राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची माहिती  जळगाव : जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथे  मुलीच्या आत्महत्येप्रकरणात ...

Suggestions for extension of clause in case of suicide of a victim in Navidabhadi | नवीदाभाडीतील पीडितेच्या आत्महत्या प्रकरणात कलम वाढविण्याच्या सूचना 

नवीदाभाडीतील पीडितेच्या आत्महत्या प्रकरणात कलम वाढविण्याच्या सूचना 

Next

पत्रकार परिषद : राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची माहिती 
जळगाव : जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथे  मुलीच्या आत्महत्येप्रकरणात ३२५ हे कलम लावलेले नव्हते. ही बाब लक्षात आल्याने या प्रकरणात हे कलम वाढविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याची माहिती  राष्ट्रीय अनुसुचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली. या सोबतच या नवीदाभाडी व मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील प्रकरणांमध्ये पीडित मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.  
जिल्ह्यात दोन ठिकाणी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. याची दखल घेत राष्ट्रीय अनुसुचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर जळगावात पत्रकार परिषद घेत या विषयी माहिती दिली. या वेळी आयोगाच्या सहायक निर्देशक अनुराधा दुसाने, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील आदी उपस्थित होते. 
नवीदाभाडी, ता.जामनेर येथील मुलीने गावातील दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली होती.  या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित आयोगाने दखल घेतली व शुक्रवारी तेथे आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी भेट दिली. या दरम्यान  सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी ३२५ (हाणामारी, जखम करणे) हे कलम लावलेले नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या प्रकरणात हे कलम वाढविण्याची सूचना पोलिसांना दिली असल्याची माहिती पारधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
या अत्याचारग्रस्त पीडीतेच्या कुटुंबियांस मदत म्हणून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आठ लाख २५ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून त्या पैकी चार लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना देण्यात आल्याचेही पारधी यांनी या वेळी सांगितले. 

परप्रांतातील मुलीलाही मदत
उचंदा, ता.मुक्ताईनगर येथे मध्यप्रदेशातील युवती मावशीकडे आली असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. तिच्याही कुटुंबियांची पारधी यांनी भेट घेवून  दोन लाखांचा धनादेश देण्यात आल्याचे पारधी यांनी सांगितले. या मुलीच्या कुटुंबीयास मदत म्हणून चार लाख रुपये मंजूर केले असून ही मुलगी मध्यप्रदेशातील असली तरी ही घटना आपल्या राज्यात घडल्याने तिलाही मदत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

गुन्हेगार सुटू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न आवश्यक
मुलींवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना दुर्दैवी असून अशा घटनांमध्ये पीडीत, तिचे कुटुंबीय यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाचा प्रयत्न राहणार असे, पारधी यांनी सांगितले. अशा घटनांमध्ये गुन्हेगार सुटू नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही पारधी यांनी नमूद केले. 

कुटुंबाला न्यायाची अपेक्षा
नवीदाभाडी व उचंदा येथील कुटुंबीयांच्या भेटी दरम्यान त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. या सोबतच या कुटुंबीयांनी आम्हाला, न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली असल्याचे पारधी म्हणाले. त्यांच्या मागणीनुसार अशा प्रकरणांमध्ये न्याय देण्यासाठी आयोगाचे प्रयत्न राहणार असल्याचे पारधी म्हणाले. 

Web Title: Suggestions for extension of clause in case of suicide of a victim in Navidabhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव