भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दाम्पत्याची पेट्रोल टाकून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:06 PM2019-03-19T18:06:14+5:302019-03-19T18:08:22+5:30
गोंडगाव येथे दि.१८ रोजी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास शेतकरी दाम्पत्याने पेट्रोल टाकून आत्महत्या केली.
गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथे दि.१८ रोजी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास शेतकरी दाम्पत्याने पेट्रोल टाकून आत्महत्या केली. दिलीप गोविंदा पाटील (वय ४६) व पत्नी भारती दिलीप पाटील (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे की, गोंडगाव येथील शेतकरी दिलीप गोविंदा पाटील व पत्नी भारती दिलीप पाटील हे दोघे शेतातील काम आपटून सोमवारी सायंकाळी घरी परतले. रात्री जेवण करून १८ च्या मध्यरात्रीनंतर अचानक गल्लीत दिलीप हा जळालेल्या अवस्थेत बाहेर आला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गल्लीतील ग्रामस्थ बाहेर खाटीवर झोपले होते. अचानक पेट घेतलेला तरुण वाचवा वाचवा म्हणत घरातून बाहेर धावत पळत आला. तेव्हा ग्रामस्थांनी लगेचच आरडाओरडा केला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तो अर्धमेला अवस्थेत दिसून आला. परंतु तो चांगलाच जळालेल्या स्थितीत होता, तर घरातूनदेखील धूर निघत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहिले असता पत्नी भारती पाटीलदेखील जळालेल्या अवस्थेत मृत दिसून आली.
घटना घडली त्यावेळी पती-पत्नी घरात तर दिलीपची आई बाहेरील घरात झोपली होती. गावातील ग्रामस्थांनी लागलीच पोलीस पाटील वाल्मीक मोरे यांना कळविले.
ज्या घरात दिलीप व भारती यांनी पेट्रोल टाकून आत्महत्या केली, त्या घरात पोलिसांना एक लीटर पेट्रोलची कॅन तसेच रक्ताचे डाग आढळून आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. घटना नेमके का घडली याविषयी माहिती मिळू शकली नाही. परंतु दिलीपने काही दिवसांपूर्वी शेतात विहिरीवर विद्युत पंप मशीन चालू असताना त्या मशीनच्या दांड्याने गळा कापण्याचा प्रयत्न केला होता, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
मयत दिलीप व भारती पाटील यांना एक मुलगा व एक मुलगी आहेश्र मुलगा हर्षल हा १२ वर्षांचा असून तो इयत्ता चौथीत, तर मुलगी निकिता ही १७ वर्षांची असून, ती बारावीत कजगाव येथे मामाकडे शिकत आहे. त्यांना घटनेची माहिती मिळाली असती ते ओक्साबोक्सी रडत होते. मयत दिलीप व भारती हे दोघे कजगाव येथे वास्तव्यास होते. परंतु गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ते गोंडगाव येथे राहण्यास आले होते.
पंचनामा करतेवेळी ज्या घरात आत्महत्या केली तेथे रक्ताचे डाग व पेट्रोलची कॅन आढळून आल्याने रक्ताचे नमुने घेण्यासाठी रक्त तपासणी लॅबचालकास बोलविण्यात आले होते. ते तपासणीसाठी नेण्यात आल्याचे गोंडगाव पोलीस पाटील वाल्मीक मोरे यांनी सांगितले.
यावेळी चाळीसगाव विभागाचे विभागीय पोलीस उपअधीक्षक नजीर शेख , भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय वेरुळे, स.पो.नि. रवींद्र जाधव, रायटर पांडुरंग सोनवणे, अमोल पाटील, विजय पाटील,महिला कॉन्स्टेबल म्हस्के आदी उपस्थित होते.
१९ रोजीच अंत्यविधी
१९ रोजीच दुपारी २.४५ वाजता दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते. मुलगा हर्षल व मुलगी निकिता यांना अश्रू अनावर झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी यावेळी त्यांना धीर दिला.