व्यवसायात नुकसान झाल्याने वृध्द व्यावसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:54+5:302021-01-20T04:16:54+5:30
जळगाव : व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यामुळे आदर्शनगरातील वृध्द व्यवसायिकाने राहत्या घराच्या कंपाउंडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ...
जळगाव : व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यामुळे आदर्शनगरातील वृध्द व्यवसायिकाने राहत्या घराच्या कंपाउंडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिरचुमल मथुरादास बजाज (६४) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी वृध्दाने सुसाईड नोट लिहिली असून त्यात व्यवसायात नुकसान झाल्याचे नमुद असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिरचुमल बजाज हे आदर्शनगरात एकटेच राहत होते. त्यांचा ऑईलचा व्यवसाय होता. सोमवारी मध्यरात्री त्यांनी घराच्या कंपाउंडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारी राहत असलेल्या रहिवाश्यांना मिरचुमल हे गळफास घेतलेले दिसून आले. त्यांनी लागलीच त्यांच्या कुटूंबियांना संपर्क साधून घटना कळविली. ही घटना रामानंदनगर पोलिसांना कळताच, त्यांनी देखील घटनास्थळ गाठले होते. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. यावेळी नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी झाली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रवी बजाज यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महेंद्र पाटील, चेतन अहिरे करीत आहेत.
मृत्यूस आपणच जबाबदार
मिरचुमल बजाज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात व्यवसायात नुकसान झाल्याचे नमुद असून ज्यांनी नुकसान केले त्यांचीही नावे असल्याचे सूत्रांकडून कळाले. मात्र, आत्महत्येस आपणच जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमुद केलेले आहे,अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. बजाज यांच्या पश्चात भाऊ, मुले असा परिवार आहे.