विवाहिता व तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:10 PM2020-06-18T12:10:07+5:302020-06-18T12:10:53+5:30
जळगाव : पिंप्राळा हुडको येथील मुळ रहिवाशी असलेल्या संतोष फकिरा अंभोरे (३७, ह.मु.बांभोरी, ता. धरणगाव) या तरुणाने बांभोरी येथील ...
जळगाव : पिंप्राळा हुडको येथील मुळ रहिवाशी असलेल्या संतोष फकिरा अंभोरे (३७, ह.मु.बांभोरी, ता. धरणगाव) या तरुणाने बांभोरी येथील गिरणा नदीपात्रातील विहिरीत उडी घेऊन तर आजाराला कंटाळून आशा सुनील कुमावत (३९, रा.बळीराम पेठ) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना बुधवारी सकाळी घडल्या.
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
संतोष अंभोरे बुधवारी सकाळी १०.३० वाजता बांभोरी गिरणा नदीपात्रातील विहिरीत उडी घेतली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष हा वाळूच्या ठेक्यावर मजुरीचे काम करायचा. गेल्या आठवड्यापासून कुटुंबात वाद सुरु असल्याने पत्नी खेडी-कढोली येथे माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो जास्त तणावात आला होता. पोहणाऱ्या तरुणांनी संतोषचा विहीरीतून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. संतोष याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.
आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
दुर्धर आजाराला कंटाळून आशा सुनील कुमावत या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशा यांचे पती सुनील नानासाहेब कुमावत हे पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरीला आहेत. पत्नी आशा यांच्यावर नाशिक येथील डॉक्टरांचे उपचार सुरु होते. पती सकाळी ९.३० वाजता ड्युटीवर तर मुलगा बाहेर गेल्याने त्या कालावधीत आशा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती सुनील कुमावत यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रदीप बडगुजर करीत आहेत.