आई व भावाची आत्महत्या, पित्यापाठोपाठ मुलाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:13+5:302021-03-31T04:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दैवाचा फेरा हा कठीण असतो. वडिलांचे अपघाती निधन, आई व भावाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दैवाचा फेरा हा कठीण असतो. वडिलांचे अपघाती निधन, आई व भावाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबात एकमेव शिल्लक राहिलेल्या प्रशांत रामकृष्ण चाैधरी (४०, रा. नेरी, ता. जामनेर) या सराफ कारागिराचा जळगाव शिरसोली रस्त्यावरील लुंकड कंपनीजवळ सोमवारी सायंकाळी ५ वाजता अपघाती मृत्यूची झाल्याची घटना झाली. एकाच कुटुंबातील चौघांच्या अपघाती मृत्यूनंतर ही श्रृखंला खंडित झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा जळगाव शहरातील महेश सुभाष बागुल यांच्याकडे सोनार काम करीत होता. सोमवारी संध्याकाळी तो योगेश सुरेश जाधव यांच्यासोबत दुचाकीने (एमएच १९ सीएच ९९९०) शिरसोली येथे जेवणाला गेला होता. तेथून परत येत असताना पाच वाजता लुंकड कंपनीजवळ वळणावर असलेल्या बॅरिकेट्सवर दुचाकी धडकली. त्यात मागे बसलेला प्रशांत चौधरी याच्या डोक्याला बॅरिकेट्स लागल्याने मेंदू बाहेर आला. त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाला, तर योगेश जाधव हा जखमी झाला. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशांत त्याला मृत घोषित केले. दरम्यान, महेश बागुल यांच्या फिर्यादीवरून योगेश जाधव राहणार जळगाव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सहा महिन्यांपूर्वी भावाची आत्महत्या
प्रशांत याच्या आईचे दहा वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. स्वतःला जाळून घेतल्याने आत्महत्या केली होती, तर दोन वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले. आता सहा महिन्यांपूर्वी लहान भाऊ नीलेश याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे चौधरी परिवारात फक्त प्रशांत हा एकटाच होता. त्याचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला.
एक दिवस आधीच बहिणीकडून आला
जिल्ह्यात तीन दिवसांचे लाॅकडाऊन जाहीर झाल्यामुळे प्रशांत हा कासोदा येथे असलेल्या बहिणीकडे गेला होता. एक दिवस आधीच तो जळगावला आला होता. संध्याकाळी मित्रासोबत जेवणाला गेला आणि ही घटना घडली. रामेश्वर असणारे काका तुकाराम यादव चौधरी यांनी त्याचा अंत्यविधी पार पडला. मेहरुण स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.